शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली कोटींची फसवणूक प्रकरणी होता फरार
रविवारी रात्री स्थानिक पोलिसांनी साफळा रचत कारीवडे येथून घेतले होते ताब्यात
सावंतवाडी | प्रतिनिधी :
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा कारिवडे येथून अटक केली. गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या कारिवडेकरला आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल व अन्य पुरावा हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.
सावंतवाडीतील सर्वोदय नगर येथे २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील शौनक सपकाळ यांच्या गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याचा मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर हा तेव्हापासून फरार होता. तो रविवारी रात्री कारिवडे येथील आपल्या सासरवाडीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सागर कारिवडेकर याच्यावर केवळ खुनाचा प्रयत्नच नाही, तर ठाणे आणि मुंबई येथे आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने सचिन राणे आणि प्रिती राणे यांच्यासोबत मिळून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मोठे रॅकेट चालवले असल्याचा आरोप होता. पुणे आणि ठाण्यातील अनेक गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) आणि ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम’ (MPID) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
कारिवडेकर फरार असतानाच, काही दिवसांपूर्वी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सावंतवाडीत दाखल होत त्याच्या आलिशान बंगल्यावर कारवाई केली होती. बंगला बंद असल्याने कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला आणि मालमत्ता जप्त करून बंगला सील करण्यात आला होता.
कारिवडेकरने सावंतवाडीतील अनेक उच्चभ्रू व्यक्तींनाही गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढले होते. खुनाचा प्रयत्न आणि आर्थिक फसवणूक अशा दोन्ही प्रकरणांत आता पोलिसांचा तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि अन्य महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.
दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि जयेश खंदरकर करत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.












