कुणकेश्वर यात्रेची सांगता, देवस्वाऱ्यांचे समुद्रस्नान पार

कुणकेश्वर तीर्थस्थानी लोटला भाविकांचा जनसागर

दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

“हर हर महादेव”च्या जयघोषात, “ओम नम: शिवाय”च्या नामजपात व “श्री देव कुणकेश्वर”च्या नामघोषात कुणकेश्वर महाशिवरात्रौत्सवामध्ये पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. गुरुवारी दर्श अमावास्येची पर्वणी असून, यादिवशी पवित्र तीर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.

श्री देव कुणकेश्वरची शासकीय पूजा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर दर्शनाला सुरूवात झाली. उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, देवगड तहसीलदार आर. जे. पवार यांनी पहाटे दर्शन घेतले. पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.

दिवसभरात अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शन घेतले.
यामध्ये—
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, सौ. निलमताई राणे, पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे, आ. किरण (भैय्या) सामंत, रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, अमोल लोके, गटविकास अधिकारी वृक्षाली यादव आदींनी दर्शन घेतले.

देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी व मान्यवर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रथमच विक्रमी १० देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीस

यावर्षी यात्रा केवळ दोनच दिवसांची असल्याने सकाळपासूनच दर्शनासाठी अलोट गर्दी होती. यात्रेत प्रथमच विक्रमी १० देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी आल्या.

विशेष म्हणजे—

  • मिठबांव श्री देव रामेश्वर देवस्वारी तब्बल ३०० वर्षांनी कुणकेश्वर भेटीस आली.
  • श्री इनामदार रामेश्वर संस्थान (आचरा) श्री देव रामेश्वराची देवस्वारी तब्बल ३९ वर्षांनी आली.
  • शिरगाव श्री देवी पावणाईदेवी २२ वर्षांनी आली.
  • देवगड जामसंडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्बा रामेश्वर देवस्वारी १२ वर्षांनी आली.

याशिवाय—

  • श्री देव माधवगिरी माईन (कणकवली)
  • श्री गांगेश्वर (नारींग्रे)
  • श्री देव जैनगळ रवळनाथ महालक्ष्मी पावणादेवी (गांगो बिडवाडी, कणकवली)
  • श्री देव गांगेश्वर (बावशी बेळणे, कणकवली)
  • श्री पावणादेवी (हुंबरठ, कणकवली)
  • श्री गांगेश्वर पावणाई भावई (दाभोळे)

ही देवस्वाऱ्या देखील कुणकेश्वर भेटीला आल्या होत्या.

यामुळे पहिल्याच दिवशी उच्चांकी गर्दी झाली होती.


यात्रा परिसराची रंगत

रस्त्याच्या दुतर्फा—

  • विविध प्रकारची मिठाई, मालवणी खाजा, हॉटेल्स, कापड दुकाने, चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलून गेला होता.
  • पारंपरिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती.
  • कुणकेश्वर समुद्रकिनारी भेल, आईस्क्रीम व विविध हॉटेल्स यामुळे समुद्रकिनारा भरून गेला होता.

चायना वस्तू, हस्तकला वस्तू व धार्मिक-सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यामुळे संपूर्ण यात्रा सजली होती.

गृहपयोगी वस्तू व कळंगड बाजाराने संपूर्ण कुणकेश्वर सजला होता.


दर्शन व सोयीसुविधांची विशेष व्यवस्था

  • मंदिर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
  • देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळ यांनी दर्शनासाठी खास रांगांची व्यवस्था केली होती.
  • देवगड पंचायत समितीमार्फत मंदीरासमोर विविध योजनांची माहिती देण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता.
  • आपत्ती व्यवस्थापन व तहसीलदार नियंत्रण कक्षही कार्यरत होते.
  • तालुका विधी सेवा समितीमार्फत जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला होता.

सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन

  • सागरी सुरक्षेसाठी लाइफ जॅकेटधारी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतर्क होते.
  • ग्रामस्थांचे भरारी पथक समुद्रस्नान करणाऱ्या भाविकांवर लक्ष ठेवत होते.
  • अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क होती.
  • वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रयत्नशील होते.
  • पोलीसांचे टेहळणी पथक सतत कार्यरत होते.

एस. टी. प्रशासनाची विशेष सेवा

  • भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर एस. टी. गाड्या तैनात होत्या.
  • पोलीस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती.
  • दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.

समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची गर्दी

सायंकाळपासून समुद्रकिनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचा उच्चांक दिसून येत होता.

  • अनुचित प्रकार घडू नये म्हणून महिला पोलीस व अधिकारी तैनात होते.
  • कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवकही कार्यरत होते.
  • ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्या संयुक्त नियोजनाने यात्रा यशस्वी झाली.

श्री देव कुणकेश्वराच्या कृपेने, महाशिवरात्रौत्सव यात्रेचा सोहळा अत्यंत भव्य, दिव्य व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.