खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत स्वच्छतेविषयक मोहीम गतिमान केली आहे. गाव चकाचक ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येत आहे. यापाठोपाठ कृषी कचरा जाळू नये, याकरिताही ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले जात आहे.
ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची कार्यशाळा घेवून कृषी कचरा न जाळण्याचे आवाहन केले. सरपंच सुनील मोरे, उपसरपंच नामदेव सोंडकर यांच्यासह ग्रामस्थ कार्यशाळेत सहभागी झाले होते. अभियानांतर्गत आजवर राबवलेल्या विविधांगी उपक्रमांना ग्रामस्थांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अभियान सर्वच पातळ्यांवर यशस्वी होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने आता स्वच्छतेवर सर्वाधिक भर देत ग्रामस्थांचे आरोग्यमान कायम सदृढ ठेवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी कचरा न जाळण्याचा निर्धार केला आहे.











