रत्नागिरी, सावंतवाडी पॅसेंजर्ससाठी दिवा स्थानक गैरसोयीचे

खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावर चालवण्यात येणाऱ्या दिवा – रत्नागिरीसह दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांसाठी सुरूवातीचे स्थानक म्हणून दिवा स्थानक गैरसोयीचे आहे. या दोन्ही गाड्या दादर किंवा सीएसएमटी मुंबई स्थानकांवरून सोडण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

दिवा स्थानकावर सद्यस्थितीत गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही. रेल्वे बोर्डाने १६ एप्रिल २०१०मध्ये जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी सुरुवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले असतानाही येथून सुटणाऱ्या दोन्ही गाड्यांमध्ये पाणी पनवेल स्थानकावर भरण्यात येते. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबत
असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव-बांद्रे, एलटीटी-मडगाव या कोकणातील बहुतांश स्थानकावर थांबत नाहीत. केवळ सावंतवाडी एक्स्प्रेस व रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यापैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भाईंदर, वसई, विरार येथे वास्तव्यास आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना यातायात करावी लागत आहे. या गाड्या दादर किंवा सीएसएमटी मुंबईपर्यंत विस्तारित केल्यास प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.