चीपी गावांतील शेतीच्या जमिनीत व माड बागायती मध्ये घुसले खारे पाणी : शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान

परुळे | प्रतिनिधी : शनिवारी समुद्राला मोठी भरती आली. या भरतीचे पाणी बाजूच्या खाडीमध्ये वाढले. परिणामी आजुबाजूच्या शेतांमध्ये हे पाणी घुसल्याने चीपी गावांतील शेतीच्या जमिनीत आणि माड बागायती मध्ये हे खारे पाणी घुसून शेतकरी व ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले आहे.

चीपी गावाला लागून कर्ली खाडी वाहते ती नजीकच्या कर्ली गावातून जात समुद्राला मिळते. त्यामुळे भरती च्या वेळी खारे पाणी खाडीत वाढते. हे खारे पाणी मग शेती च्या दिशेने घुसते परिणामी खारे पाणी शेतकर्‍यांच्या शेती बागायती मध्ये घुसून नुकसान होत आहे. काल असेच मोठ्या प्रमाणात समुद्राला भरती आली त्यामुळे पाणी आत शिरले आणि नुकसान झाले.
चीपी गावांतील खाडी च्या तिथे खार बंधाऱ्याचे काम संबंधित विभागाकडून रेंगाळले आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी या कामाची मागणी केली आहे, तरी खारबंधाऱ्याचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कालच्या आलेल्या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकर्‍याची नुकसानी झाली आहे. खारभूमि विभागाच्या दिरंगाईमुळे शेतकर्‍यांच्या शेती बागायतीचे नुकसान झाले आहे असा आरोप चीपी गावचे उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी केला आहे.