खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील नांदगाव-जाखलवाडी येथे गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घर भस्मसात झाले. शॉर्टसर्किटनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटाने आगीचा भडका उडाला. आगीत घरासह गृहोपयोगी साहित्य जळून खाक होवून लाखोंची हानी झाली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. घरात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
नांदगाव-जाखलवाडी येथे वास्तव्यास असलेल्या राजश्री दौलत खोपटकर या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास अचानक त्यांच्या घराने पेट घेतला. रणरणत्या उन्हासह वाऱ्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे काही ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच सर्व गावकरी आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहचले. आग भडकत असतानाच झालेल्या शॉर्टसर्किटनंतर सिलिंडर स्फोटाने ग्रामस्थ हादरले.
या स्फोटानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहचलेले ग्रामस्थही सैरावैरा धावू लागले. काही क्षणातच घर भस्मसात होवून होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत खोपटकर कुटुंबियांचा संसार उघड्यावरच पडला आहे. घराला आग लागल्याची माहिती मिळताच महावितरणचे घटनास्थळी पोहचले. कर्मचारी खबरदारी म्हणून गावातील संपूर्ण वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.तर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागानं आग विझवली











