पावसाच्या पाण्यावरून झाला मोठा वाद; ‘ग्रामीण’ मध्ये चौघाविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी : प्रतिनिधी : पावसाच्या येणाऱ्या पाण्यावरुन मारहाण केल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार १८ मे रोजी रात्री 9.30 वा.सुमारास ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
यातील संशयित व तक्रारदार एकमेकांचे शेजारी असून पावसाच्या पाण्यावरुन त्यांच्यात वाद आहेत. गुरुवारी रात्री संशयित हे तक्रारदार व तिच्या पतीला पावसाळ्यात तुमच्या घराचे पाणी आमच्याकडे येते तुम्ही घर बांधताना जागा का नाही सोडली असे म्हणाले. त्यावर तक्रारदार यांनी संशयितांना सांगितले की, आम्ही प्रथम घर बांधले आहे तुम्ही नंतर घर बांधले आहे. त्यामुळे तुम्ही काही अंतर जागा ठेऊन घर बांधायला हवे होते असे सांगितल्याचा राग आल्याने संशयितांनी घरातील काठी आणून तक्रारदार यांना मारहाण करुन दुखापत केली. यावेळी तिचे पती मद्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









