शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख : प्रेरणादायी प्रवास
सावंतवाडी तालुक्यातील मडुरासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेत केवळ जिद्द, चिकाटी, अपार मेहनत, महत्वाकांक्षा, प्रामाणिकपणा व संघटनकौशल्य या गुणांच्या जोरावर शिवसेना शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख असा प्रेरणादायी प्रवास करणारे कतृत्ववान नेतृत्व म्हणजे शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब. समाजकारण व राजकारण यांची योग्य सांगड घालत ऐतिहासिक सुंदरवाडी नगरीचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या संजू परब यांनी त्यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची प्रथम शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर आता शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची धुरा सोपविली आहे. जिल्हाप्रमुखपदाच्या त्यांच्या या नव्या इनिंगच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा ..

सच्चिदानंद उर्फ संजू परब. शाखाप्रमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेस तालुकाध्यक्ष व त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा प्रवक्ता ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष व शिवसेना जिल्हा संघटक ते आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एक थक्क करणारा राजकीय प्रवास. आपल्या नेतृत्वासोबत ज्या ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला त्या त्या पक्षात त्यांनी आपली छाप सोडत विविध पदे भुषविली व त्या पदांना व पक्ष संघटनेला न्याय दिला.
संजू परब या नावाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भल्याभल्यांना दखल घ्यायला लावली. आपल्या सडेतोड बोलण्याने विरोधकांना अंगावर घेतले तर नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालात तेवढ्याच ताकदीने प्रशासन चालवत आपण एक कार्यकुशल प्रशासक असल्याचेही आपल्या कतृत्वाने सिद्ध केले. कोरोनाच्या काळात घरात न बसता जीवावर उदार होऊन सावंतवाडीकरांसाठी रस्त्यावर उतरून त्यांना सहकार्य करत आपण केवळ राजकारण करीत नाही तर आपला वसा हा समाजकारणाचा आहे हे देखील त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. त्यामूळेच सर्वपक्षीय नेत्यांना संजू बद्दल नेहमीच आदर राहिला आहे.
मडूरा सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या संजू परब यांचे शिक्षण व पदवी शिक्षण सावंतवाडीतच झाले. मुळापासून नेतृत्वाचे गुण असणारा हा कार्यकर्ता माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या संपर्कात आला आणि त्या परिस स्पर्शाने अक्षरशः सोने होऊन गेला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.

मैत्री जपण्याची एक विलक्षण हातोटी संजू परब यांच्याकडे आहे. मैत्रीला नि:स्वार्थपणे जागणारा एक उत्तम मित्र. असा त्यांचा त्यांच्या मित्रपरिवारात लौकिक आहे. स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक महत्त्वाचा पैलू. एखाद्या पक्षाच्या नेत्यापासून ते समपातळीवरील नेत्यांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांसमोर ही ते अत्यंत स्पष्टपणे व परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांनी मांडलेली मते, घेतलेली भूमिका अथवा निर्णय अचूक असतात. कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी त्या निवडणुकीचे सर्वोत्तम व्यवस्थापन हा आजच्या राजकारणाचा विजयी मंत्र आहे. संजू परब यांना हाच मंत्र गवसला आहे त्यातूनच पक्षनेतृत्वाने कोणत्याही निवडणूकीची जबाबदारी ते लिलया पार पाडतात व दैदिप्यमान यशही मिळवत विरोधकांना त्यांच्याच सारीपाटावर अक्षरशः चितपट करतात.
दूरदृष्टी असलेले चाणाक्ष नेतृत्व म्हणून संजू परब यांच्याकडे पाहिले जाते. उत्तम राजकीय व्यवस्थापनाचे कौशल्य, नावीन्याचा ध्यास आणि दूरदृष्टीचे वरदान, राजकारणातील जाणकार ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आहेत. समाजकार्यासाठी सतत नाविन्याच्या शोधात दूरदृष्टीने आणि चाणाक्षपणे ते विकासकामांची बांधणी करत सावंतवाडीला सुंदर शहर बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यामूळेच सत्तेच्या राजकीय सारीपाटात एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे वावरणार्या संजू परब यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या गुणाने आजवर ही उत्तुंग झेप घेतली आहे.

नेतृत्व दातृत्व व कतृत्व या तिन्ही गुणांना मेहनतीची जोड देत समाजकारण व राजकारणाची सांगड घालत आपल्या कार्यकतृत्वाने केवळ सावंतवाडीतच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख संजू परब यांनी निर्माण केली. अभ्यासपूर्ण मांडलेली परखड मते, विरोधकांचा वेळोवेळी घेतलेला समाचार असो की नगराध्यक्षपदाच्या कार्यकालात सावंतवाडीकर नागरिकांच्या हितासाठी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण निर्णय असो त्यांनी नेहमीच आपल्या कर्तुत्वाची चुणूक दाखवून दिली आहे. नगराध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी सावंतवाडी शहरात बंद पडलेले अनेक प्रकल्प त्यांनी नगराध्यक्ष होताच मार्गी लावले. अनेक नवीन प्रकल्पांना देखील त्यांनी मंजुरी मिळवून दिली. बॅ. नाथ पै सभागृह, संत गाडगेबाबा मंडई, अग्निशमन केंद्र, पाळणेकोंड धरणाच्या गोडबोले गेटची वाढवलेली उंची असे अनेक लोकाभिमुख व महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले व वरिष्ठ नेतृत्वाच्या माध्यमातून ते मार्गी देखील लावले.
आ. निलेश राणे यांचा खंदा समर्थक अशी संजू परब यांची ओळख. निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्ह्यातील जी काही मोजकी मंडळी त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेशकर्ती झाली त्यात संजू परब हे नाव आघाडीवर होते. आपल्या काही निवडक सहकाऱ्यांसमवेत त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रवेशानंतर स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांच्यावर जिल्हा संघटक पदाची जबाबदारी दिली. या पदाच्या अगदी अल्पावधीच्या कार्यकालात संजू परब यांनी उबाठा शिवसेना व महाविकास आघाडीतील अनेक सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन संघटना वाढविण्याचे काम केले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अखेर आ. दीपक केसरकर यांच्यासह आ. निलेश राणे व शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
आ.निलेश राणेंचा लाडका कार्यकर्ता म्हणून संजूची ओळख आहेच. पण पक्षनेतृत्वाने दिलेली कोणतीही जबाबदारी मग ती पक्ष संघटनेची असो की निवडणुकीची अथवा एखाद्या सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाची संजूने आपल्या कौशल्याने नेहमीच ती लिलया पार पाडली आहे. सावंतवाडी शहरात घेतलेले सुंदरवाडी महोत्सव असो वा लाखो रुपयांचे दहीहंडी कार्यक्रम त्यांनी सावंतवाडीकर नागरिकांना नेहमीच भव्य दिव्य देण्याचा प्रयत्न केला. आपले नेते निलेश राणे यांचा वाढदिवस देखील त्यांनी नेहमीच विविध व मोठमोठ्या कार्यक्रमाने साजरा केला.
नेत्यांनी दिलेली कोणतीही जबाबदारी तन-मन-धन अर्पण करून पूर्ण करून देणे हेच त्यांचे नेहमी ध्येय राहिले आहे. त्यासाठी सर्वस्व पणाला लावून उद्दिष्ट पुर्ती करणे हा त्यांचा हातखंडा राहिला आहे.
त्यामुळेच यापूर्वी आमदार निलेश राणे यांचा लाडका कार्यकर्ता असलेला संजू परब आता आमदार दीपक केसरकर यांच्या देखील गळ्यातील ताईत बनला आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या विजयात संजू परब यांचा मोलाचा वाटा होता हे कोणीही नाकारणार नाहीत.
काम मग ते कोणतेही असो एक ध्येय घेऊन झपाटल्याप्रमाणे संजू काम करत असतो. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने गावागावात भेटी देत मतदारसंघ पिंजून काढत कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष संघटना वाढीचे काम अगदी प्रामाणिकपणे करणे हीच संजूची हातोटी आहे.
गावागावातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर त्याची नाळ जोडली गेली असल्यामुळे विविध पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्याच्यासोबत काम करण्यास नेहमीच इच्छुक असतात. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जात अडल्या-नडल्यांना पदरमोड करून मदत करणे हा संजूचा स्थायीभाव आहे. एक दिलदार मित्र त्याचप्रमाणे एक विश्वासू नेतृत्व म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिले जाते. दांडगा जनसंपर्क ही देखील त्याची खुबी आहे. केवळ एका फोन कॉलवर हजारोंची गर्दी जमविण्याची हातोटी देखील त्याने आत्मसात केली आहे. अर्थात यासाठी आपल्या आयुष्यातील क्षणन क्षण त्याने सामाजिक व राजकीय कार्यासाठी वाहून घेतला असल्यानेच त्याने जनमानसात आपली वेगळी प्रतिमा व जागा निर्माण केली आहे.
आतापर्यंतच्या त्याच्या या सामाजिक व राजकीय प्रवासात त्याची सुविज्ञ पत्नी मिनल, दोन्ही मुली वैष्णवी व सई, त्याचे दिवंगत वडिल व आई यांची समर्थपणे साथ लाभली आहे. कुटुंब व राजकारण याचा ताळमेळ राखत त्यांनी नेहमी कुटुंबालाही तेवढाच वेळ दिला आहे. स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असलेल्या संजू परब यांच्या घरी आध्यात्मिक वारसा आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका त्यांच्या निवासस्थानी दाखल होत असतात. ते देखील सहकुटुंब नेहमी श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील दर्शनाला जात असतात. राजकारणाबरोबरच बांधकाम व्यवसाय क्षेत्रात कार्यरत ते कार्यरत असून आपल्या व्यवसायालाही ते नेहमी प्राधान्य देत असतात. अर्थातच या मध्ये त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी मीनल यांचा खंबीर पाठिंबा मिळत आहे.
दानशुरपणा हा संजूचा महत्वाचा गुण. या गुणामुळे आज संजू हा जनतेच्या मनातील नेता बनला आहे. आपल्या नेतृत्वगुणाने व दानशूरपणाने सावंतवाडीकर नागरिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे. कोणत्याही प्रसंगात सुख दुःखात धावून येणारा ‘आपला हक्काचा माणूस ‘ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाल संपल्यानंतरही आजही तेवढ्याच कर्तव्य भावनेने तो जनतेच्या प्रश्नांसाठी झटत असतो. पदावर असो किंवा नसो, त्यांची नाळ सामान्य माणसाशी जुळलेली आहे. नेते जेव्हा जनतेला हवेहवेसे वाटतात तेच नेते सामाजिक नेतृत्व करू शकतात.
असेच जनतेच्या मनातील कार्यकुशल नेतृत्व असलेल्या संजू परब यांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या नव्या इनिंगला ते निश्चितच न्याय देतील यात कोणतीही शंका नाही.
शब्दांकन व पुरवणी संकलन – सावंतवाडी










