बौद्धजन सेवा संघाच्या वतीने तहसील कार्यालयावर निवेदन सादर
देवगड (प्रतिनिधी): देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती निर्धार रॅली शुक्रवारी देवगड कॉलेज नाका येथून तहसील कार्यालयावर काढण्यात आली. या रॅलीत धम्म उपासक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा – मागणी
बोधगया विहार येथील महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्यात यावा आणि महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार आर. जे. पवार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्याची विनंती
देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाने राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन सुपूर्त केले. निवेदनात असे नमूद करण्यात आले की, महाबोधी महाविहार गेली अनेक वर्षे बौद्ध भिक्षू आणि धर्मियांच्या ताब्यात मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जगभरातून या लढ्यास पाठिंबा मिळत असून, हा मुक्तिसंग्राम न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील.
महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करण्याची मागणी
१९४९ च्या बी.टी. अॅक्टनुसार महाबोधी महाविहार प्रशासनात सर्व प्रतिनिधी बौद्ध असणे आवश्यक होते. मात्र, विहार बौद्ध धर्मियांच्या ऐवजी हिंदू धर्मीय महंतांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
संघाच्या वतीने हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या कलम २४५ नुसार रद्द करण्यात यावा आणि फक्त बौद्ध धर्मियांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निर्धार रॅलीत प्रमुख उपस्थिती
रॅलीत बौद्धजन सेवा संघाचे अध्यक्ष शामसुंदर जाधव, उपाध्यक्ष सुरेश कदम, सचिव सुनील जाधव, डी. के. पडेलकर, मनोहर सावंत, महिला अध्यक्ष पूजा जाधव, सौ. सुरभी पुरळकर, विनायक मिठबांवकर, विजय कदम, के. एस. कदम, अजित कांबळे, विशाखा साळसकर, रश्मी पडेलकर, नितेश जाधव, आनंद देवगडकर, श्रीपत टेंबवलकर, दिलीप कदम, राजू साळसकर, समीर शिरगावकर, सुमित कदम, प्रविण मोरे, अभिषेक कदम, महेश परूळेकर आदी पदाधिकारी आणि बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.











