ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची प्रेरणा अंतर्मुख करावयास लावणारी आहे — श्रीकांत चाळके

खेड(प्रतिनिधी) अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहक चळवळीमध्ये सक्रिय असणारी देशभरातील एकमेव स्वायत्त संस्था आहे. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते निस्वार्थी वृत्तीने ग्राहकांमध्ये त्यांचे अधिकार व हक्काची जाणीव व जागृती निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अशा कार्यकर्त्यांची प्रेरणा अंतर्मुख करावयास लावणारी आहे असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांतांचे प्रसार प्रमुख श्री श्रीकांत चाळके यांनी केले.

जागतिक ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि खेड तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने खेड येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्राहकांना श्री श्रीकांत चाळके यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री चाळके यांनी ग्राहक संघटन व ग्राहक प्रबोधन कार्यामध्ये ग्राहक पंचायतीचे असलेले महत्त्व विशद केले. प्रारंभी ग्राहक पंचायतीचे तालुका सचिव श्री विजय येरुंकर आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री नामदेव काळबोन्डे यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले.
श्री. चाळके यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याची विस्तृत माहिती दिली.अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची स्थापना १९७४ मध्ये डॉ बिंदू माधव जोशी यांनी केली. ग्राहक चळवळीचे ते प्रणेते आहेत. त्यांनी उभारलेल्या या ग्राहक चळवळीच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक शक्तीमुळेच हे शक्य झाले आहे हे त्यांनी नमूद केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्राहकांसाठी सुरू असलेल्या जागृती, प्रबोधन व ग्राहकांचे संरक्षणा कामी प्रयत्नाची दखल भारत सरकारने देखील घेतली आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले. जागो ग्राहक जागो या अभियानामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतची महत्त्वाची भूमिका असून ग्राहक संरक्षणाकामी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने भारत सरकारला वेळोवेळी सुचवलेले मार्ग भारत सरकारने अमलात आणले आहेत, हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सर्वात मोठे यश आहे असे हे श्री चाळके म्हणाले. श्री. चाळके यांनी यावेळी ग्राहकांचे विविध प्रकारे होतं असलेल्या फसवणूकीपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे याकरिता २०१९ च्या ग्राहक संरक्षण कायद्याची थोडक्यात माहिती दिली. आधुनिक काळात ग्राहकांनी सजग राहण्याची आवशकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुरवठा अधिकारी श्री अमोल देशमुख यांनी कोणत्याही समस्यांचे निराकारण करण्यासाठी ग्राहक पंचायत कार्य करीत असून त्यांनी खेड मधील ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांची प्रशंसा केली.यावेळी पुरवठा निरीक्षक धवल मॅडम, पुरवठा सहाय्यक श्री नामदेव कलबोन्डे, ग्राहक पंचायतीचे तालुका सचिव श्री विजय येरुणकर, उप कोषध्यक्ष अजित तटकरे, महिला संघटक व पोलीस पाटील दळवी मॅडम, दिनेश शिर्के, श्री उपाणेकर, पुरवठा विभागातील कर्मचारी, रेशन दुकानदार, ग्राहक व व्यापारी उपस्थित होते.