लाखो रुपये खर्चून पाडण्यात आलेली बोअरवेल विना वापर पडून

बोअरवेलवर पंप बसवून पाणी टंचाईग्रस्त

ग्रामस्थांना पाणी देण्याची मागणी

संतोष कोत्रे | लांजा –: एकीकडे लांजा तालुक्याच्या पाणीटंचाईग्रस्त कृती आराखड्यावर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना इसवली सुतारवाडी येथे सन २०२३ मध्ये शासकीय फंडातून पाडण्यात आलेली बोअरवेल गेल्या दोन वर्षांपासून विनावापर पडून आहे. त्यामुळे या बोअरवेलवर पाणी पंप बसवून किंवा हॅंड पंप बसवावा. जेणेकरून येथील पाणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होईल. या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी येथील मनसेचे साटवली जि प विभाग अध्यक्ष सागर मेस्त्री यांनी केली आहे

 

लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात सागर मेस्त्री यांनी म्हटले आहे की ,लांजा तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या इसवली सुतारवाडी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या पाणीटंचाई फंडातून मे २०२३ मध्ये एक बोअरवेल पाडण्यात आली होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या बोअरवेलचा येथील ग्रामस्थांना अजिबात उपयोग झालेला नाही.कारण ही बोरवेल विनावापर तशीच पडून आहे. लाखो रुपये खर्च करून व बोअरवेल उपलब्ध असताना देखील येथील ग्रामस्थांना या बोअरवेलच्या पाण्याचा उपयोग होत नसेल तर मग शासनाने लाखो रुपये खर्च कशासाठी केले?
असा प्रश्न सागर मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे .

 

लाखो रुपये खर्च करून शासकीय फंडातून बोअरवेल पाडलेली असताना देखील त्या बोअरवेलवर कोणताही इलेक्ट्रिक पंप किंवा हॅन्ड पंप आज पर्यंत बसवला गेलेला नसल्याने येथील ग्रामस्थांना बोअरवेल असून देखील पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत खरोखरच पाणीटंचाई मुक्त आहे का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे .
त्यामुळे एकूणच बाब लक्षात घेता विना वापर पडून असलेल्या बोरवेलवर इलेक्ट्रिक पंप किंवा हॅन्ड पंप बसवून ही बोअरवेल वापरात आणावी आणि येथील ग्रामस्थांची पाण्या अभावी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी सागर मेस्त्री यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.