संगमेश्वरच्या पुरवठा निरीक्षकाच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला केले अटक
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी (वर्ग 1 ) पदावर कार्यरत असणाऱ्या प्रदीप प्रितम केदार याला 11 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ कार्यालयात नकारात्मक अहवाल न पाठवण्यासाठी संगमेश्वरच्या पुरवठा निरीक्षकाकडून लाच घेताना ही कारवाई करण्यात आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या अखत्यारित असणाऱ्या संगमेश्वर येथील धान्य गोदामाला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग आणि संगमेश्वर तहसीलदार यांनी 22 मार्च रोजी भेट दिली असता त्यावेळी तक्रारदार पुरवठा निरीक्षक हे त्यावेळी तक्रारदार हे गैरहजर होते. तसेच त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. केदार यांनी तक्रारदार यांच्या अखत्यारीतील गोदामाची तपासणी करून धान्य साठ्यामध्ये तफावत असल्याचे सांगून तसेच गैरहजर असल्याचे सांगत तुमचा वरिष्ठ कार्यालयास नकारात्मक अहवाल पाठवणार अशी भीती घातली आणि असा अहवाल पाठवायचा नसेल तर 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानुसार तडजोडीअंती जिल्हा पुरवठा अधिकारी केदार यांनी दिनांक 28 मार्च रोजी 11 हजार रुपये लाचेची मागणी करून ती घेऊन येण्यास तक्रारदाराला सांगितले. ही काचेची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकारी केदार याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान रंगेहात पकडण्यात आले. केदार याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाहीला रात्री उशिरापर्यंत रत्नागिरी कार्यालयात सुरू होती.
लाचलूचपत विभागाचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव यांच्यासह सहाय्यक फौजदार चांदणे, पोहवा/ दीपक आंबेकर, पोहवा / संजय वाघाटे, पोह/ विशाल नलावडे, पोअं/ राजेश गावकर यांनी या कारवाईत भाग घेतला.











