सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यव्यापी अभियानात सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत सैनिक स्कूलने भौतिक सुविधा, विद्यार्थी विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर हे यश संपादन केले. यापूर्वी सन २०२३-२४ मध्ये शाळेने या अभियानात तृतीय क्रमांक मिळवला होता.
शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा, शासनाच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादणूक यांसारख्या विविध निकषांवर तज्ञ मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व गुणात्मक विकास, आरोग्य, स्वच्छता, क्रीडा आणि पर्यावरण जागृती यांसारख्या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यामुळे सैनिक स्कूलने बाजी मारली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासोबतच शालेय प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्ता प्रभावीपणे जपल्याचे या मूल्यांकनात दिसून आले.
सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी मा. कल्पना बोडके आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रमोद पावस्कर यांच्या हस्ते सैनिक स्कूलला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. शाळेने दर्जेदार अध्यापनाचा वारसा कायम राखल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.
दरम्यान, सैनिक स्कूलमध्ये सन २०२५-२६ या वर्षासाठी इयत्ता ६ वी आणि ११ वी (विज्ञान) शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच इतर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी साहसी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. इच्छुक पालकांनी अधिक माहितीसाठी ९४२०१९५५१८ / ७८२२९४२०८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळेचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी केले आहे.












