‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळा’कडून संविताश्रमाला जीवनावश्यक वस्तू भेट 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : रस्त्यावरील निराधार बांधवांना हक्काचा आसरा देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित ‘संविता आश्रम’ यांना येथील बाजारपेठ नवरात्र उत्सव मंडळाने आपल्या सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंची मदत देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवला. मंडळाच्या या मदतीमुळे बेघर आणि निराधार व्यक्तींसाठी काम करणाऱ्या आश्रमाच्या कार्याला मोठा हातभार लागला आहे.

मंडळाचे अध्यक्ष दीपक केसरकर आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा मदतीचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येऊन आश्रमातील गरजू लोकांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या.

या वस्तू मंडळाचे सदस्य शैलेश गवंडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘संविता आश्रमा’च्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आल्या. ‘संविता आश्रम’ हे बेघर, निराधार व्यक्तींना आसरा देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. या उपक्रमातून ‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने’ सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

‘संविता आश्रमा’च्या या महान कार्याला हातभार लावल्याबद्दल ‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळा’चे सावंतवाडी शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.