कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील तुळसूली येथील एका अत्यंत गरीब कुटुंबातील सहा वर्ष चार महिन्यांचे बाळ एका गंभीर आजाराने त्रस्त असून, त्याच्या जीवाला वाचवण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. सध्या मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु डॉक्टरांनी आजच शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. या शस्त्रक्रियेसाठी आणखी ७० हजार रुपयांची गरज असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केल्यास या चिमुकल्याचा जीव वाचू शकतो, असे नम्र आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यापूर्वीही या बाळाच्या मदतीसाठी पुढे सरसावले होते आणि आता पुन्हा एकदा मदतीसाठी प्रयत्न करत आहे. अधिक माहितीसाठी किंवा थेट मदत करण्यासाठी इच्छुक नागरिक बाळाच्या वडिलांशी ९३२५९८०६८४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. तसेच, बाजूला दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करूनही देणगी देता येईल.
एका गरीब कुटुंबातील निरागस बालकाचा जीव वाचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी उदार मनाने योगदान देण्याचे आवाहन रवी जाधव यांनी केले आहे. आपल्या लहानशा मदतीने एका कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो, याची जाणीव ठेवून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











