बांद्यात बेकायदा ६ लाख ८३ हजारांची दारू जप्त

६४ बॉक्ससह सोलापूरचे दोघेजण ताब्यात : इन्सुली एक्साइजची कारवाई

बांदा l प्रतिनिधी :गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने बांदा – ओटवणे रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईत ६ लाख ८३ हजार ६४० रुपयांची दारू आणि ६ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप व अंदाजे २० हजार रुपयाचे भाजीचे रिकामी कॅरेट असा एकूण १३ लाख ३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मालक शंकर दत्तात्रय मस्के (४३) आणि वाहन चालक सचिन शिवाजी वाघमारे (२७, दोघेही रा. बोरामणी, जि सोलापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई सुभेदार हॉटेल नजीक बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

 

सदर कारवाई जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, धनंजय साळुंखे, जवान रणजीत शिंदे, अभिषेक खत्री, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले यांच्या पथकाने कारवाई केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.