हनुमान जन्मोत्सवानिमित्त गाडीअड्डा येथील डोंगरावरील मंदिरात उपक्रम
वेंगुर्ले | दाजी नाईक : बजरंग बली की जय.. जय श्री राम..हर हर महादेव…अशी गर्जना करीत संपूर्ण देशभरात हनुमान जयंती उत्सव उत्साहात साजरा होत असताना शरीरसौष्ठवपटूंचे आराध्य दैवत बजरंग बली या बजरंगबलीच्या जन्मोत्सवानिमित्त वेंगुर्ले येथे शरीर सौष्ठवपटूंनी दहा हजार जोर व बैठका मारत बजरंग बलीच्या चरणी आगळा वेगळा अभिषेक अर्पण केला आहे.
गेली २५ वर्ष वेंगुर्ले येथील श्री. सातेरी सोनसुरकर व्यायाम शाळा व विरासत हनुमान मंडळ यांच्या वतीने वेंगुर्ले गाडीअड्डा येथील अतिशय उंचावर डोंगरात असलेल्या हनुमान मंदिरात व्यायामपटू ट्रेकिंग करत हनुमान मंदिरात पहाटे पोहचतात. आणि नंतर एकत्रित रित्या जोर बैठकांचा हनुमान चरणी अभिषेक वाहतात.
यावर्षी शरीरसौष्ठवपटूंचे राष्ट्रीय पंच किशोर सोनसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, पुरुष, आबाल वृद्ध व शालेय मुलांनी जोर बैठका कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपलाही सहभाग नोंदविला.










