कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन मागे
वेतन रखडवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची नोटीस
राजापूर (प्रतिनिधी): काम बंद आंदोलन पुकारताच नगर परिषद प्रशासनाने संबधित ठेकेदार कंपनीला तातडीने कर्मचाऱ्यांचे थकित वेदन अदा करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारी सायंकाळी या ठेकेदार कंपनीकडून सर्व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे रखडलेले वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले आहे. तशी माहिती नगर परिषदेचे कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.
मात्र अशा प्रकारे कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवणाऱ्या या ठेकेदार कंपनीविरोधात कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून कंत्राटी कर्मचारी पुरविणेबाबत नव्याने निविदा काढण्यात आली असुन निवीदा प्रक्रिया तपासून नवीन कंपनीकडे नियम व अटींवर हे काम दिले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
राजापूर नगर परिषदेमध्ये कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या बांधकाम, स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांसह डेटा ऑपरेटरना संबधीत व्ही. डी. के. नामक ठेकेदार कंपनीकडून मार्च महिन्याचा पगार देण्यात न आल्याने या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे या विभागांशी निगडीत असलेले न. प. प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले होते.
मंगळवारी या एकूणच प्रश्नी माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे व रवींद्र बावधनकर यांनी नगर परिषदेवर धडक देत या विरोधात जाब विचारला. यावेळी संबधित ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले व त्याला नोटीस देण्यात आली .
दरम्यान मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी देखील या प्रश्नी लक्ष घालुन राजापूरात येत कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तसेच संबधित ठेकेदार कंपनीला तातडीने कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे संबधित ठेकेदार कंपनीकडून या सर्व कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन अदा करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे. मंगळवारी सायंकाळ पासूनच या सर्व विभागातील कर्मचारी कामावर रूजू झाल्याचे जाधव यांनी सांगितले.
तर कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा कमी वेतन देणे, अधिक कर्मचारी दाखवून अनुदान लाटणे या प्रकरणी संबधित ठेकेदार कंपनीला नोटीस अदा करण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले. तर आता यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली असून नवीन कंपनीला हे काम अटी व नियमांवर देण्यात येईल असेही जाधव यांनी सांगितले.
——————————————————-










