अडचणींसंदर्भात महाराष्ट्र गोवा बार काऊन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांचे नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने मंत्री नितेश राणे यांची घेतली भेट ; विविध विषयांवर सकारात्मक चर्चा

अमित खोत | मालवण : मालवण व सावंतवाडी न्यायालयाच्या इमारतींच्या पुनर्बांधणीमधील अडचणींसंदर्भात महाराष्ट्र गोवा बार काऊन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांचे नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली.
मालवण व सावंतवाडी न्यायालयाच्या इमारतींच्या पुनर्बांधणीमधील अडचणींसंदर्भात सावंतवाडी व मालवण तालुका वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र गोवा बार काऊन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांचे नेतृत्वाखाली व सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांचेसमवेत मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली.
तालुका न्यायालयांमधील वकील, पक्षकार व प्रकरणांची वाढती संख्या व भविष्यातील विस्तार विचारात घेऊन अत्याधुनिक सोईसुविधा अंतर्भूत करण्याकरीता इमारतीची पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. त्याची पुनर्बांधणी मुळ ठिकाणीच करण्यात यावी अशी वकीलांची मागणी होती. सावंतवाडी न्यायालयाच्याबाबत जमीनीचा प्रश्न व मालवण न्यायालयाच्या बाबतीत सीआरझेड कायद्यातील निर्बंधाची बाधा येत असल्याने व बांधकामाकरीता जागा अपुरी पडत असल्याने सदर कामास गती मिळत नव्हती. या समस्यांच्या निराकरणाकरीता संबंधित खात्याचे मंत्री व मुख्यमंत्री यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळणे आवश्यक होते. त्याकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची तालुका वकील संघटनेतर्फे भेट घेऊन संबंधित कायदेशीर अडचणींच्या निवारणासाठी लेखी निवेदन देऊन याबाबत सहकार्य व मार्गदर्शन मिळण्याची विनंती केली. त्यावर मंत्रीमहोदयांनी या विषयाची त्वरेने व गंभीरतेने दखल घेऊन समक्षच संबंधित खात्याच्या सचिवांकडे शिफारसपत्र पाठविण्याच्या सूचना दिल्या. या विषयाबाबत संबंधित खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी येथे वकील भवन उभारणीकरीता भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकीलांना प्रशिक्षणाकरीता व कायदेविषयक कार्यक्रमांकरीता हक्काचे वकील भवन प्राप्त होऊ शकणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालय इमारत पुनर्बांधणीनंतर अत्याधुनिक सोईसुविधांमुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ हेण्यास मदत होणार आहे.
यावेळी बार काऊन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा वकील संटना अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, सावंतवाडी वकील संघटनेचे प्रतिनिधी ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. शामराव सावंत, ॲड. अण्णा बांदेकर आणि मालवण तालुका वकील संघटनेचे प्रतिनिधी ॲड. हेमेंद्र गोवेकर,ॲड. अविनाश पाटकर, ॲड. स्वरुप पई उपस्थित होते.












