रेल्वे प्रवाशाची ९२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लांबवली

कोकण रेल्वे मार्गावर दादर ते विलवडे रेल्वे स्टेशन दरम्यानची घटना

लांजा (प्रतिनिधी) कोकण कन्या एक्सप्रेसने दादर ते विलवडे असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या गळ्यातील ९२ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना दि. १५ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १६ एप्रिल रोजी पहाटे ६.३० या कालावधीत दादर रेल्वे स्टेशन ते विलवडे रेल्वे स्टेशन या प्रवासादरम्यान घडली आहे.

याबाबतची तक्रार रमाकांत गणपत आयरे (वय ५६, रा. मुंबई विलेपार्ले ) यांनी केली आहे. रमाकांत आयरे हे दिनांक १५ एप्रिल रोजी कोकण कन्या एक्सप्रेसने दादर ते विलवडे रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यात असलेली ९२ हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने लांबवली आहे.

याप्रकरणी रमाकांत आयरे यांनी सुरुवातीला दादर रेल्वे स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लांजा पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार करण्यात आली असून पोलिसांनी आज सोमवारी २१ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गून्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.