सत्यवान रेडकर यांना कोकण विकास समितीचा ‘कोकणरत्न’ पुरस्कार

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठणी (बोरभाटवाडी) गावचे सुपुत्र आणि मुंबई सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांना कोकण विकास समितीच्या वतीने ‘कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कोकणातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. सत्यवान रेडकर यांनी “शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव” आणि “भ्रष्टाचार मुक्त प्रशासन” यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य मार्गदर्शन व्याख्याने आयोजित करतात. याद्वारे, महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू व्हावेत, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३२५ निःशुल्क मार्गदर्शन व्याख्याने दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली २२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

मुलुंड (पूर्व) येथील छत्रपती राजे संभाजी सांस्कृतिक भवनात २३ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित कोकण विकास महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोकण विकास समितीचे अध्यक्ष-संस्थापक श्री. जयवंत शं. दरेकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सत्यवान रेडकर यांच्या आई, श्रीमती द्रौपदी यशवंत रेडकर यांनी स्वीकारला. यावेळी ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. सचिन यशवंत रेडकर उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील योग्य व्यक्तीची ‘कोकणरत्न’ पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल कोकण विकास समिती आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच, श्री. सत्यवान रेडकर यांच्या कार्याचे अभिनंदन केले जात आहे.