मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांची मागणी
सावंतवाडी : उन्हाळी सुट्टी तोंडावर असताना सावंतवाडी शहरातील मोती तलावातील बोटिंग क्लब तात्काळ सुरू करण्याची मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केली आहे.
शहरातील मोती तलावात पर्यटकांना जलविहाराचा आनंद घेता यावा यासाठी लाखो रुपये खर्चून बोटी खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या तलावातील कारंजाच्या कामामुळे या बोटी बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या बोटी त्याच अवस्थेत पडून असल्याने त्या सडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांच्या पैशांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून बोटिंग क्लब सुरू करावा, असे आवाहन केतन सावंत यांनी केले आहे.
या संदर्भात सावंत यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मोती तलावातील बोटिंग हा पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिलाईमुळे लाखो रुपये किमतीच्या नवीन बोटी धूळ खात पडल्या आहेत. अनेक पर्यटक बोटिंगसाठी विचारणा करत असताना त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. आता उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रकल्प त्वरित सुरू करणे आवश्यक आहे.
मागील वेळी बोटींच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वेळी प्रशासनाने वेळीच जागे होऊन सकारात्मक भूमिका घ्यावी आणि रखडलेला बोटिंग क्लब सुरू करावा, जेणेकरून नागरिकांचे पैसे वाया जाणार नाहीत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.












