दाणोली विद्यालयाचे मुख्याध्यापक जयवंत पाटील यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

दाणोली: दाणोली येथील कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जयवंत पाटील यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना नुकताच ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोवा येथील साखळी येथे बेळगावीच्या नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कर्नाटक राज्याचे पोलीस कमांडर श्री. अरविंद गट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभास कोल्हापूरचे माजी महापौर श्री. राजू शिंगाडे, गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी श्री. प्रशांत नाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. जयवंत पाटील यांनी या गौरवाचे श्रेय कै. बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, जिल्हा पाटयेकर तसेच संस्थेचे विद्यमान पदाधिकारी, सहकारी शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उत्कृष्ट सहकार्याला दिले.

 

कै. बाबुराव पाटेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असण्यासोबतच श्री. जयवंत पाटील सावंतवाडी तालुका विद्या सेवक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाला गौरवण्यासाठी त्यांची या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड झाली. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील पाच राज्यांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली, हे विशेष उल्लेखनीय आहे.
श्री. जयवंत पाटील यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कै. बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद नाईक, संस्थेचे इतर पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
फोटो ओळ: कर्नाटक राज्याचे पोलीस कमांडर अरविंद गट्टी यांच्या हस्ते जयवंत पाटील यांना पुरस्कार प्रदान करताना. सोबत सौ. पाटील, राजू शिंगाडे, प्रशांत नाईक व अन्य मान्यवर.