मुंबई : मालवणचो कट्टो प्रतिष्ठान (रजि.) मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या निमित्ताने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. थॅलेसेमिया निर्मूलनाच्या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग रेड बटालियन, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन आणि ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर समर्पण रक्तपेढी, घाटकोपर (पूर्व) येथे उत्साहात पार पडले.
असह्य उन्हाळ्याची पर्वा न करता, थॅलेसेमिया रुग्णांच्या रक्ताच्या गरजेची जाणीव ठेवून या चारही संस्थांच्या शूर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या दात्यांनी केलेले रक्तदान अनेक गरजू रुग्णांना जीवदान देणारे ठरले.
या शिबिराला रक्तदानाची चळवळ उभी करणारे प्रेरणास्रोत सुरेश प्रभाकर रेवणकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून रक्तदात्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वतः ११० वेळा रक्तदान आणि ५२ वेळा पांढऱ्या पेशी दान करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अनेकवेळा प्लेटलेट दान करणारे समीर सावंत यांनीही उपस्थित राहून प्लेटलेट डोनेशन केले.
मालवणचो कट्टो प्रतिष्ठानचे वैशिष्ट्य म्हणजे या शिबिरात अनेक नवीन रक्तदात्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले, तसेच काही महिन्यांपूर्वी रक्तदान केलेल्या जुन्या रक्तदात्यांनीही पुन्हा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. समाजातील एका विशिष्ट घटकासाठी सदैव तत्पर असणाऱ्या या रक्तदात्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात चारही ग्रुपचे रक्तदाते, उपस्थित सदस्य आणि व्यवस्थापकांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. वैभव गावडे आणि कृष्णा कदम यांनी उत्तम नाश्त्याची सोय केली, तर विनायक पाटील आणि गुरुदास घाडी यांनी या उपक्रमाच्या महत्त्वपूर्ण क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सचिन जोईल यांनी लॅपटॉपवर सर्व रक्तदात्यांची व्यवस्थित नोंदणी केली.
या रक्तदान शिबिरात खालील रक्तदात्यांनी सक्रिय सहभाग घेतला:
सचिन चाफळे, विजय पांचाळ, निलेश नागोटकर, जयप्रकाश पुजारी, प्रदीप चव्हाण, विलास लांडगे, प्रकाश भोसले, अजय सकपाळ, ज्योती गुरव, सुमित पोयरेकर, भूषण पोंडे, आनंद साबळे, संतोष आवारे, समीर जाधव, अभिषेक राऊळ, अजित सूर्यवंशी, ओमकार म्हात्रे, विशाल पेडणेकर, नरेश हरसुले, रितिक सावंत, आरती घाडी, मितेश परब, ओमकार परब.
राहुल गाडे, जान्हवी नागोटकर, स्नेहा मालप आणि ओंकार जोशी हे इच्छुक असूनही काही कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत.
या यशस्वी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतलेल्या चारही समूहांतील सर्व रक्तदाते, उपस्थित सदस्य, मान्यवर आणि इतर सहकारी समूहांचे मालवणचो प्रतिष्ठानचे सुधीर कांदळकर यांनी आभार मानले.












