यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटमधील ५५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

सावंतवाडी । प्रतिनिधी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ५५ विद्यार्थ्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये उत्कृष्ट यश मिळवले आहे. त्यांची निवड आयएफबी, जीई, केएसपीजी ऑटोमोटिव्ह आणि विप्रो यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये झाली आहे.

कॉलेजमध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये या विद्यार्थ्यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये होम अप्लायन्सेस क्षेत्रातील आयएफबी कंपनीमध्ये १७, जनरल इलेक्ट्रिकमध्ये १४, ऑटोमोटिव्ह सुटे भाग बनवणारी कंपनी केएसपीजी ऑटोमोटिव्हमध्ये सर्वाधिक २२ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोमध्ये २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

निवड झालेले सर्व विद्यार्थी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे आहेत. कॉलेजच्या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख मिलिंद देसाई यांनी या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत. या निवडीमुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.