फुफेरे नवलादेवी मंदिरातील दहा घंटांसह समईचोरी , अज्ञाताविरुध्द राजापूर पोलिसात गुन्हा दाखल

राजापूर / प्रतिनिधी –तालुक्यातील फुपेरे येथील ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दहा घंटा, एक समई आणि दानपेटीतील किरकोळ रक्कम चोरल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. दरम्यान राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी सकाळी गावातील ग्रामस्थ श्री प्रभाकर अण्णाजी भोवड हे शनिवारी सकाळी पावणे नऊच्या दरम्यान ग्राममंदिरात लग्न पत्रिका देवतेला अर्पण करण्यासाठी गेले असता मंदिरातील घंटा चोरीला गेल्या असल्याचे  त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तात्काळ गावातील आपल्या ग्रामस्थांना झाल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. समस्त ग्रामस्थ मंदिरामध्ये दाखल झाले. त्यावेळी मंदिरातील जवळपास दहा घंटा, एक समई जाग्यावर नव्हत्या. तर मंदिराची दानपेटी फोडण्यात आली होती. त्या घटनेने गावात चांगलीच खळबळ उडाली. राजापूर पोलीस स्टेशन मध्ये खबर देण्यात आली. राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासात मंदिरातील दहा घंटा, एक समई यांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. तर मंदिरातील दानपेटी फोडण्यात आली होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर दानपेटी मध्ये किरकोळ पैसे होते. चोरट्यांनी त्याच्यावरही डल्ला मारला.श्री.नवलादेवीचे मंदिर हे जंगली भागात आहे. सदर प्रकरणी राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार कमलाकर पाटील अधिक तपास करीत आहेत.

फुफेरे येथीलश्री नवलादेवी मंदिरात झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली आहे.