सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील चव्हाटावाडी ते राळकरवाडी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थ १ मे रोजी उपोषण जाहिर केले होते. मात्र, गटविकास अधिकारी यांनी पंधरा दिवसात या रस्त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी गावातील रहिवासी आत्माराम नारायण साटेलकर आणि ४० ग्रामस्थांनी याच मागणीसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्यालय ओरोस येथे उपोषण केले होते.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणानंतर दीड महिना पाठपुरावा करूनही रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सरकारी कर्मचारी केवळ पत्रव्यवहार करत असून या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता.
या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ओरोस यांना निवेदन पाठवले होते. निवेदनात त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी १५ ते २० दिवसांच्या आत रस्ता खुला करून, आवश्यक भराव टाकून पक्का रस्ता करण्याची मागणी केली होती. निवेदनासोबत मागील उपोषणाचे पत्र आणि ग्रामपंचायत धाकोरे तसेच संबंधित शासकीय कार्यालयांशी केलेला पत्रव्यवहार जोडण्यात आला होता.
या संदर्भात २८ एप्रिल रोजी दुपारी झालेल्या बैठकीत तक्रारदारांनी गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्या समक्ष त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी १ मे रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित केले.
या संदर्भात अधिक माहिती देताना तक्रारदारांनी सांगितले की, गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत योग्य कार्यवाही न झाल्यास पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल.












