उन्हाळी सुट्टी हंगामातही खेड मधील एस.टी.चे उपाहारगृह बंदच

आगारप्रमुखांचे दुर्लक्ष : जुन्या परवानाधारकांची नाहक बदनामी
खेड(प्रतिनिधी)उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने येथील एस.टी. बस स्थानक प्रवाशांच्या रेलचेलीने गजबजलेले असतानाही एस.टी. प्रशासनाचे उपहार गृह अजूनही बंदच आहे. ठेकेदाराने भाडे थकवल्याचा कांगावा करत उपाहारगृहाला कुलूप लागलेले आहे.
परंतु या संदर्भात पूर्वीचे ठेकेदार आनंदराव टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोणतही भाडे थकलेले नाही. मला परवडत नाही. त्यामुळे मी एस.टी.चे उपाहारगृह दीड वर्षांपूर्वीच बंद केलेले आहे. तसा लेखी राजीनामा एस.टी. महामंडळाकडे सुपूर्द केलेला आहे. मी सोडल्यानंतर या ठिकाणी नवीन निविदा काढून एस.टी. उपहारगृह चालवायला देणे आवश्यक होते. परंतु स्थानिक अधिकारी व कर्मचारी आपलीच मनमानी करत असून मी भाडे थकवले अशा पद्धतीने बोंबाबोंब करून माझी नाहक बदनामी करत आहेत. अशी माहिती पूर्वीचे परवानाधारक आनंदराव टिळेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
गेल्या दीड वर्षापासून एस.टी.च्या उपहारगृहाला लागलेले कुलूप अजूनही  कायम आहे. याचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. सकाळच्या सुमारास अन्य हॉटेल, सर्व टपरी बंद असल्याने प्रवाशांची परवड सुरू आहे. गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या पद्धतीने बचत गटाला प्रवाशांच्या नाष्ट्याची सोय करण्याची मुभा दिली होती. गणेशोत्सव संपुष्टात आल्यानंतर उपहारगृहातील बचत गटाचे बस्तान उठले. तेव्हापासून उपहार गृह बंदच आहे. एस.टी. बसच्या चालक वाहकांचा अन्य कर्मचाऱ्यांनाही बंदावस्थेतील उपहारगृहाचा मोठा फटका बसत आहे. प्रवाशांशह कर्मचाऱ्यांचे बंद असलेल्या उपहारगृहा अभावी ससेहोलपट सुरू असताना एस.टी. प्रशासन पर्यायी व्यवस्थेचा अवलंब करत नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच जुने परवानाधारक आनंदराव टिळेकर यांची एस.टी.च्या आगारप्रमुखासह अन्य अधिकाऱ्यांकडून नाहक बदनामी सुरू असल्याने त्यांनी देखील एस.टी. च्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे.