महाराष्ट्रातील युवा गुणवान खेळाडूंना एमपीएलमुळे संधी रोहित पवार

महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ तिसरा मोसम मे ते जून 2025 दरम्यान रंगणार

दापोली l प्रतिनिधी: महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेट पटूना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेट पटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा असल्याचे उदगार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी काढले.

 

दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात पार पडलेल्या खास पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त ते बोलत होते. या प्रसंगी मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फील्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे चेअरमन श्री. सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य श्री. शुभेंद्र भांडारकर, श्री. राजू काणे, श्री सुनील मुथा, श्री. विनायक द्रविड, श्री. सुशील शेवाळे, श्री. रणजीत खिरीड, सीईओ श्री. अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

 

श्री. रोहित पवार पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग हा केवळ एक स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात व तळागाळात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा, होतकरू व गुणी खेळाडूंना आपले टॅलेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघमालकांचा मोलाचा वाटा आहे. आमचा दृढ विश्वास आहे की येत्या काळात एमपीएल देशातील सर्वात लोकप्रिय आणि व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये अग्रस्थानावर असेल.”

 

मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ यांनी सांगितले की, “दरवर्षी नव्या खेळाडूंच्या आणि संघाच्या सहभागामुळे या स्पर्धेचा आलेख दरवर्षी वाढत आहे, हे स्पष्ट होते. विशेषतः महिला विभागातील प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे. अनेक नवोदित खेळाडू या माध्यमातून राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास आहे.”

 

कमलेश पिसाळ पुढे म्हणाले की, दरवर्षी नवनव्या खेळाडू आणि संघांच्या सहभागामुळे या स्पर्धेचा परीघ वाढत चालला आहे. महाराष्ट्राच्या गुणवान खेळाडूंसाठी सातारा वॉरियर्स संघ ही सुवर्णसंधी ठरणार असून या संघाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील गुणवान महिला व पुरुष क्रिकेट पटूना राष्ट्रीय प्रकाश झोतात येण्यासाठी प्रथमच सुवर्णसंधी मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स व पुष्प सोलापूर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी ईगल नाशिक टायटन्स, पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी 45 पुणेरी बाप्पा या संघाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करता येणार आहे. अनेक नवोदित खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ साठीचा खेळाडू लिलाव १७ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे मोठ्या

 

जल्लोषात पार पडला. या लिलावाद्वारे राज्यभरातील उदयोन्मुख आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे.

 

या वर्षीच्या लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.

 

पुरुष विभागात रजनीश गुरबानी या वेगवान गोलंदाजावर PBG कोल्हापूर टस्कर्स संघाने सर्वाधिक ₹५,२०,००० ची बोली लावून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. महिला विभागात तेजल हसबनीस यांच्यावर पुष्प सोलापूर संघाने ₹४,४०,००० ची सर्वाधिक बोली लावली.

 

या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.

 

स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) व स्टार स्पोर्ट्स (Star Sports) या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

 

एमपीएल २०२५ सहभागी संघ

 

1. 45 पुणेरी बाप्पा

 

2. PBG कोल्हापूर टस्कर्स

 

3. रत्नागिरी जेट्स

 

4. ईगल नाशिक टायटन्स

 

5. सातारा वॉरियर्स

 

6. रायगड रॉयल्स

 

डब्लूएमपीएल २०२५ सहभागी संघ

 

1. पुणे वॉरियर्स

 

2. रत्नागिरी जेट्स

 

3. पुष्प सोलापूर

 

4. रायगड रॉयल्स