नेर्लेतील महिलांचे बेमुदत उपोषण अखेर मागे

वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांची मध्यस्थी

वैभववाडी प्रतिनिधी

नेर्ले येथील काही महिलांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्या मध्यस्थीने अखेर मागे घेण्यात आले. तहसीलदार श्री पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी  त्यांची समजुत काढल्यानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले.

नेर्ले येथील श्री देव धावजी देवस्थानच्या होळी उत्सवादरम्यान लागू करण्यात आलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत सौ. नीलम नवनाथ पांचाळ व आरती भालचंद्र सुर्वे यांनी सोमवारी सकाळपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता.

सोमवारी तहसीलदार पाटील व पोलीस निरीक्षक सोनवलकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला होता.

दरम्यान मंगळवारी दिवसभर उपोषण सुरूच होते. प्रशासनाकडून सातत्याने चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर सायंकाळी पुन्हा चर्चा झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपला निर्णय बदलत उपोषण मागे घेतले. यावेळी उबाठा सेनेचे नंदू शिंदे, नायब तहसीलदार दिलीप पाटील, श्री. निकम, श्री. सुतार, पुरवठा निरीक्षक श्री. दांडगे, सुरेश पांचाळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.