उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
वैभववाडी येथे महिला सक्षमीकरण मेळावा संपन्न
वैभववाडी l प्रतिनिधी : लहान – मोठा व्यवसाय करुन कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावणाऱ्या महिलांचा निश्चित आम्हाला अभिमान आहे. गावागावातील सक्षम बचत गट एकत्रित करून नियोजनबद्ध काम करूया. महिलांनी बनवलेल्या वस्तू अथवा मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी व्यक्त केला.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरण मेळावा वैभववाडी येथे पार पडला. याप्रसंगी वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, कणकवली माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, माजी सभापती शारदा कांबळे, स्नेहलता चोरगे, नेहा माईणकर, सीमा नानिवडेकर, सुप्रिया तांबे, शामिन काझी व मोठ्या संख्येने बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
सौ. नीलमताई राणे म्हणाल्या, कुटुंबासाठी धडपडणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आहे. बचत गट गावागावात कार्यरत आहेत. परंतु बचत गटातील महिलांनी केवळ पापड व लोणची एवढ्या पुरते मर्यादित राहू नये. ग्रामीण भागात फणस व काजूचे उत्पादन खूप मोठे आहे. फणसाच्या बियापासून आयुर्वेदिक पावडर बनते. असे नाविन्यपूर्ण प्रयोग बचत गटांनी हाती घेतले पाहिजेत. बचत गटातील तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच काही बचत गट धिम्यागतीने काम करत आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शारदा कांबळे, सौ मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला गावातील उमेद बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बचत गटाच्या माध्यमातून नीलमताई राणे यांचा सत्कार करण्यात आला.











