पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून युथ फोरम देवगडचे आयोजन
युथ फोरम, देवगड आयोजित व राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून दि. १७ व १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या पटांगणावर ‘नाट्य महोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्य महोत्सवांतर्गत दर्जेदार सहा एकांकिकांची नाट्य मेजवानी प्रेक्षकांना मिळणार असून यात रत्नागिरी, चिपळूण, कुडाळसह देवगडमधील नाट्य कलाकृतींचा समावेश आहे. कलाकार, नाटक आणि रसिक प्रेक्षकांना एकत्र आणून देवगडमधील बंद पडलेल्या नाट्य चळवळीला उर्जितावस्था देण्यासाठी युथ फोरम-देवगडने हे अभिनव पाऊल उचलले आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगावकर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी दिली.
स्थानिक कलाकारांना नाटकासाठी मुंबई, पुणे येथे न जाता आपल्या गावात व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा आमचा मानस आहे. नाट्य महोत्सवाचे हे पहिले पर्व आहे. या नाट्य महोत्सवानंतर प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांचा ओघ वाढून स्थानिक कलाकारांना संधी मिळेल. या नाट्य चळवळीतून शासनाच्या माध्यमातून देवगडमध्ये एक प्रशस्त नाट्यगृह उभे राहील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून युथ फोरम ही संस्था पाठपुरावाही करणार आहे. तालुक्यातील वरिष्ठ आणि नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांना एकत्र आणून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणे हे आमचे कर्तव्य आहे. ज्येष्ठ कलाकारांच्या मार्गदर्शनातूनच नवीन कलाकारांचे सादरीकरण या नाट्य महोत्सवाला एक वेगळी उंची निर्माण करून देणारे ठरणार आहे. नाट्य महोत्सवाच्या दोन दिवसांत विविध विषयांवरील सहा दर्जेदार नाट्य एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
१७ मे रोजी सायंकाळी ७ वा. शेठ म. ग. हायस्कूल निर्मित ‘हमावणी’ (लेखिका/दिग्दर्शिका – सौ. आज्ञा अभिषेक कोयंडे), रात्री ८ वा. नाट्यशोध, रत्नागिरी निर्मित ‘कुपान’ (लेखक – कृष्णा वाळके, दिग्दर्शक – गणेश राऊत), रात्री ९ वा. ‘ढ’ मंडळी, कुडाळ निर्मित ‘वाल्मिकी’ (लेखक/दिग्दर्शक – तेजस मसके) या नाट्य एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. तर १८ मे रोजी सायंकाळी ७ वा. डी. बी. जे. हाऊसफुल्ल नाट्यसंस्था, चिपळूण निर्मित ‘लेटर बॉक्स १४३’ (लेखक – यश नवले, दिग्दर्शक – भावेश कुंतला, नितीन सावले), रात्री ८ वा. ACTASTIC Creators, देवगड निर्मित ‘वन पीस’ (लेखक – मयुर साळवी, दिग्दर्शक – आकाश सकपाळ), रात्री ९ वा. श्री समर्थ कलाविष्कार, देवगड निर्मित ‘मशाल’ (लेखक – अनिरुद्ध नारिंग्रेकर, दिग्दर्शक – विजय कदम) या नाट्य एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. याचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. माणगावकर व श्री. साटम यांनी केले आहे.










