जलजीविका संस्थेचा उपक्रम रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वी

रत्नागिरी/सिंधुदुर्ग – अल्पभूधारक शेतकरी व मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कार्यरत जलजीविका ही नोंदणीकृत अशासकीय संस्था समुद्री शेवाळ शेतीच्या माध्यमातून एक नवा उपक्रम करत आहे. संस्थेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गावांमध्ये समुद्री शेवाळ शेतीविषयी प्रशिक्षण देऊन महिलांना आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य हाती घेतले आहे.
समुद्री शेवाळ ही सूक्ष्म वनस्पती असून ती उथळ समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यात तसेच खाडी भागात आढळते. तपकिरी व लाल रंगातील शेवाळाचे उत्पादन व विक्री शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरते. जलजीविका संस्थेचे नीलकांत मिश्रा मुख्य कार्यकारी अधिकारी , सुबोध कुमार मुख्य कार्यक्रम अधिकारी, चिन्मय दामले प्रकल्प व्यवस्थापक , सृष्टी सुर्वे, राज पवार, समृद्धी सनगरे प्रकल्प समन्वयक यांच्या सहाय्याने समुद्री शेवाळ शेतीवर मार्गदर्शन करताना तराफा बांधणी, अँकरिंग, रोपे लावणे अशा सर्व टप्प्यांचा समावेश असलेले प्रशिक्षण दिले जाते .
आजपर्यंत संस्थेने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 64 बांबू तराफे यशस्वीरित्या उभारले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवाडे, अंबुवाडी येथे 22 तराफ्यांची ‘सीड बँक’ तयार करण्यात आली आहे. तसेच देवगड येथे लाभार्थ्यांसाठी 10 तराफे, तर कालवि व वायंगणी (वेंगुर्ला) या भागात 18 तराफे महिला बचत गटांना प्रदान करण्यात आले आहेत.
हा संपूर्ण प्रकल्प हर्बललाईफ या उद्योग समूहाच्या सहाय्याने राबवण्यात येत आहे. जलजीविका संस्थेचा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना व शेतकऱ्यांना शेवाळ शेतीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक आशादायी पाऊल ठरत आहे.
कार्यालयीन संपर्क क्रमांक: 8830254400
7020368925












