

संतोष मोंडे l राजापूर: शहरानजीकच्या मौजे शिळ गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मातेच्या मंदिराचा जिर्णोध्दार, मंदिर कलशारोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा अपार उत्साहात आणि धार्मिक वातावरणात मोठया उत्साहात पार पडला. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस चालेल्या या सोहळयाला शेकडो भाविकांनी हजेरी लावत श्री नवलादेवी मातेचा जयघोष करत मातेचे दर्शन घेतले. प. पू. गगनगिरी महाराज मठ कोंडीवळेचे मठाधिपती प. पू. उल्हासगिरी महाराज यांचे हस्ते कळशारोहण तर ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात झालेल्या या सोहळयाचा अभुतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची संधी यानिमित्ताने पाहण्याचे भाग्य लाभल्याची भावना शिळ ग्रामस्थांनी व्यक्त केली.
शिळ गावची ग्रामदेवत श्री नवलादेवी मातेचे भव्य दिव्य असे मंदिर उभारण्याचा सोडलेला संकल्प आणि पाहिलेले स्वप्न साकार झाल्याने समस्त शिळ वासीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्या दिवशी श्री नवलादेवी मातेची राजापूर शहर ते शिळ मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक, दुसऱ्या दिवशी मंदिरात पार पडलेले विविध धार्मिक विधी आणि शेवटच्या दिवशी कलशारोहण, मुर्ती प्राणप्रतिष्ठापना, श्री सत्यनारायण महापुजा अशा धार्मिक कार्यक्रमांनी हा सोहळा मोठया उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
सोहळयाला सोमवारी नूतन मूर्ती आगमन मिरवणुकीने शानदार प्रारंभ झाला.
मंगळवारी मंदार दिक्षित, नाना जोशी यांच्या नेतृत्वाखाली अमोल हर्डीकर, मकरंद ओळकर, अमित प. देसाई, दिलिप बोरवणकर, अक्षय शेंबवणेकर आदी ब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात प्रायश्चित्य, पुण्याहवाचन, वास्तुशांती होमहवन, मंडप देवता स्थापन, पूजन जलाधिवास, धान्याधीवास, शय्यावास असे विधी पार पडले. दुपारी महाप्रसाद बुवा केदार कदम, उपळे यांचे संगीत भजन कार्यक्रम पार पडले. धार्मिक विधींचे यजमानपद श्री. व सौ. काशिनाथ गोंडाळ यांनी भूषविले.
बुधवारी प. पू. उल्हासगिरी महाराज यांचे हस्ते जिर्णोध्दारीत मंदिरावर कळशारोहण करण्यात आले. तत्पुर्वी विधीवत कलश पूजन झाले. त्यानंतर मुख्य देवता होम हवन, सर्व देवता स्थापन व प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, बलिदान, महाआरती,. महाप्रसाद, श्री सत्यनारायण महापूजा, वारकरी सांप्रदाय मंडळाचा हरिपाठ देणगीदार व मान्यवरांचा सत्कार सोहळा, तर रात्रौ पालखी सोहळा व महाआरतीने सोहळयाची सांगता झाली. त्यांनतर समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ हे महाराष्ट्रात गाजलेले विनोदी लोकनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी श्री नवलादेवी मातेची मूर्ती साकारणारे मुर्तीकार भार्गव व नागवर्धन गुडीगर तसेच मंदिर निर्माणासाठी सहकार्य करणारे आर्किटेक्टर जगदिश पवार, ठेकेदार विजय प्रसाद तसेच संजय कुंदेकर, पेंटर संतोष कुडकर, मुखवटे पॉलिश करणारे सुवर्णकार अविनाश पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. या मंदिर निर्माणासाठी स्थानिक व मुंबईकर ग्रामस्थांनी श्रमदान व आर्थिक योगदान दिले. तर अनेक दानशुरांनी दिलेल्या आर्थिक मदतीतुन भव्य वास्तु उभी राहिली. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
तीन दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. दशक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थीत राहुन दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी श्री नवलादेवी मंदिर नुतनीकरण समिती ग्रामिण / मुंबई व श्री नवलादेवी परिवारातील सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.












