धुतपापेश्वर युवक मंडळाच्या श्रमदानातुन स्मशानभूमीची स्वच्छता

राजापूर (वार्ताहर): शहरातील धोपेश्वरघाटी येथील श्री धुतपापेश्वर युवक मंडळाच्या माध्यमातून शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये श्रमदानातुन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वैकुंठ स्मशानभूमीतील शवदाहिनी व परिसरातील कचरा, पाला पाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीचे रूपडेच पालटून गेले असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री धुतपापेश्वर युवक मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

शहरातील आंबेवाडी परिसरात वैकुंठ स्मशानभूमी असुन या ठिकाणी परिसरातील झाडी झुडपांमुळे मोठया प्रमाणात पाला पाचोळा गोळा होतो. तर शवदाहिनी व अन्य इमारतींवर मोठया प्रमाणात गवत वाढले होते. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते.

शहरातील धोपेश्वर घाटी येथील श्री धुतपापेश्वर युवक मंडळाने रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठया तरूण व प्रौढ मंडळी मोठया संख्येने सहभागी झाले होते. या मोहिमेत स्मशानभूमी परिसरातील शवदाहिनीतील राख, पाला पाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. तर सरणासाठी लागणारी लाकडे योग्य पध्दतीने तोडून ती व्यवस्थीत रचून ठेवण्यात आली. पावसाळयाच्या दिवसात प्रेत झाल्यास कोणतीही गैरसोय होवू नये या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर या स्मशानभूमीचे रूपडे पालटून गेले असून एखादया वाटीकेचे स्वरूप प्राप्त झाले.

धुतपापेश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कोंबेकर, उपाध्यक्ष सुनिल बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली सतिश तांबे, संजय बोटले, प्रविण बोटले, सुरेंद्र तांबे, संतोष चव्हाण, रविंद्र बावधनकर, कुंदन शिंदे, सहदेव पारकर, अविनाश तांबे, प्रशांत मांजरेकर, विनोद तांबे, रक्षित साखरकर, पंकज बावधनकर, मंगेश, महेश बाकाळकर, अण्णा तांबे, केतन तांबे, राजीव साखरकर, रमेश रहाटे, तेजस कांबळे, शौर्य बावधनकर अशी वाडीतील तरूण मंडळी व प्रौढ मंडळी या मोहिमेत सहभागी झाली होती.

श्री धुतपापेश्वर युवक मंडळ गेली ६४ वर्षे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून वैकुंठ स्मशानभूमीत वर्षातून दोन वेळा स्वच्छता अभियान राबविले जात असल्याची माहिती नरेंद्र कोंबेकर यांनी दिली. यासोबत रक्तदान शिबीर, विद्यार्थी गुणगौरव, करिअर मार्गदर्शन या सारखे उपक्रमही मंडळाच्या माध्यमातुन राबविले जात असल्याची माहीती कोंबेकर यांनी दिली.