भोसले इन्स्टिट्यूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र उपलब्ध
सावंतवाडी: शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेच्या सुलभतेसाठी शासनाने जिल्हानिहाय प्रवेश सुविधा केंद्र (Facilitation Center – FC) सुरू केली आहेत. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एफसी-३४७० या क्रमांकाचे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची छाननी करून घेणे, प्रवेश प्रक्रियेशी संबंधित तक्रारींचे निवारण करणे, कॅप (CAP) राऊंडसाठी पर्याय निवडणे आणि समुपदेशन अशा सर्व सेवा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळू शकेल.
राज्यात दहावी आणि बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अभियांत्रिकीला सर्वाधिक पसंती दिली जाते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पदविका अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, तर बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) उत्तीर्ण विद्यार्थी थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेऊ शकतात.
यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेशासाठी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी विद्यार्थी ९४०४२७२५६६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या शासकीय सुविधा केंद्राचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, असे आवाहनही संस्थेने केले आहे.










