आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे..!

नोकरी, संसार सांभाळत गोवळकोटमधील 

मनीषा बांद्रे यांचे दहावीत यश

चिपळूण : महिलांना अनेक कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यातीलच एक गोवळकोट येथील सौ. मनीषा वसंत बांद्रे. २५ वर्षांपूर्वी त्यांनी सातवीत शाळा सोडली. लग्न झालं. संसार सुरू झाला. संसारासाठी स्वतः नोकरी सुरू केली, परंतु शिक्षणाचे महत्त्व कुठेतरी कळलं आणि यंदा त्यांनी दहावीची परीक्षा दिली. संसार सांभाळत अभ्यास केला, कुठलाही क्लास लावला नाही आणि दहावीच्या परीक्षेत ४५ टक्के मार्क मिळवत त्यांनी आकांक्षा पुढती जिथे गगनही ठेंगणे, हे सार्थ ठरवून दाखवले आहे.

शिकण्याची जिद्द असली की, माणूस यश मिळवतोच, याचं मूर्तीमंत उदाहरण मनीषा बांद्रे यांनी दाखवून दिले आहे. २५ वर्षांपूर्वी त्यांनी सातवीत शाळा सोडली. मग पुढे लग्न झालं. तीन मुलं झाली. मोठी मुलगी बारावीला, तर दुसरी मुलगी दहावीत शिकत आहे. मुलगा सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. पती वसंत बांद्रे हे नगर पालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. संसाराचा गाढा रेटण्यासाठी त्याही शहरातील विठाई हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. शिक्षणाची ओढ असणाऱ्या मनीषा बांद्रे यांना आपले शिक्षण कमी आहे, ही गोष्ट स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी यंदा दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. तीन मुलांचे शिक्षण, स्वतःची नोकरी, असा संसार सांभाळत त्यांनी दहावीची परीक्षा दिली. घरच्या घरी अभ्यास सुरू केला. कुठलाही क्लास लावला नाही आणि सातत्य, जिद्द, प्रामाणिक प्रयत्न या बळावर त्यांनी दहावीत ४५ टक्के गुण मिळवले.

मनीषा बांद्रे यांनी मिळवलेले दहावीतील हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. संसार सांभाळत चाळीशीनंतर दहावीच्या परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी खरोखरच महिलांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

मनीषा बांद्रे यांच्या दहावीतील यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष राधा शिंदे व दिनेश शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.