मुख्याधिकाऱ्यांचे तातडीने कारवाईचे आदेश
सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील भटवाडी परिसरात सुरू असलेल्या नळ पाणी योजनेच्या पाईपलाईन खोदकामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याची माती वाहून गेल्याने रस्ते धोकादायक बनले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सावंतवाडी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (२३ मे) मुख्याधिकारी पाटील यांनी स्वतः भटवाडी परिसराची पाहणी केली.
या पाहणीवेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, समिधा नाईक, श्रीमती लाड, प्रसाद राणे, बंड्या केरकर, अनिल आयरे, रवी जाधव, रवी नाईक, गेगरी डान्टस, श्री. प्रभू देसाई, श्री. तेंडुलकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी नळ पाणी योजनेसाठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. मात्र, पाईप टाकल्यानंतर ठेकेदाराने यावर खडीकरण आणि डांबरीकरण करणे अपेक्षित होते. परंतु, ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अवकाळी पावसामुळे खोदलेले खड्डे उघडे पडले आहेत. यामुळे आतील माती रस्त्यावर येऊन सर्वत्र चिखल पसरला आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याचबरोबर, बंड्या केरकर यांच्या दुकानासमोर असलेली धोकादायक झाडे त्वरित हटवण्यासंबंधी मुख्याधिकारी पाटील यांनी झाड मालकांना नोटिसा काढण्याचे निर्देश दिले. रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक वीज खांब हटवून रस्ता सुरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या असून, या संदर्भात वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी पाटील यांनी बोरजिस वाडा, नक्षत्र अपार्टमेंट, कुणकेरी रस्ता या भागांची देखील पाहणी केली. नुकत्याच बांधलेल्या गटाराला भगदाड पडल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. नागरिकांनी रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या आणि दुरुस्त न केलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईनमुळे पडलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यावर तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. या तातडीच्या उपाययोजनांमुळे भटवाडीतील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.











