खेडमध्ये ऐन मे महिन्यात ओढे प्रवाहित मासे पकडण्यासाठी लोकांची झुंबड

खेडमध्ये डोंगर कपारीतून ओढे पाण्याने प्रवाहित
खेड(प्रतिनिधी)गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे  निसर्गाचे अद्भुत दृश्य पाहायला मिळत आहे. डोंगर कपारीतून वाहणारे ओढे खळखळाट करत प्रवाहित होऊ लागले आहेत. मे महिन्यात अशा स्वरूपाचा ओढ्यांचा प्रवाह दुर्मीळ असतो, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे हे चित्र वेळेआधीच पाहायला मिळत आहे.
पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे, डोंगरातून वाहत येणाऱ्या ओढ्यांमधून मासे देखील खाली येत असून, हे मासे पकडण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. काही ठिकाणी हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचेही पाहायला मिळत आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आगामी काही दिवसांत आणखी पावसाची शक्यता वर्तवली असून, प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.