आरवली गावचे यशस्वी उद्योजक सचिन दळवी “सारस्वत रत्न” पुरस्काराने सन्मानित

वेंगुर्ले | दाजी नाईक – आरवली गावचे सुपुत्र आणि यशस्वी उद्योजक सचिन दळवी यांना त्यांच्या कडून होत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सारस्वत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने गोवा येथे घेण्यात आलेल्या ग्लोबल सारस्वत कोन्क्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात “सारस्वत रत्न” हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सिंहपुरुष हॉल महालसा नारायणी टेम्पल मार्दोळ गोवा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमास भारतातूनच नव्हे तर प्रदेशातूनही अनेक सदस्य उपस्थित होते. मान्यवरांमध्ये धेंपो समूहाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास धेंपे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत, गोव्याचे मंत्री श्री रोहन खवटे, ज्येष्ठ गायिका हेमा सरदेसाई, एल अँड टी फायनान्स चे डायरेक्टर अनिल दुभाषी, कॅप्टन नितीन धोंड सारस्वत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर, चेंबर ऑफ कॉमर्स चे सर्व सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध विषयावर तज्ञ वक्त्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उद्योग व्यवसायामध्ये ज्याने उल्लेखनीय कार्य केले आहे अशा व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यात श्री. दळवी यांच्या सह अन्य उद्योजकांचा समावेश होता. त्यांना सारस्वत रत्न पुरस्कार तसेच शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री श्रीनिवास धेम्पे, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे डॉक्टर परुळेकर, श्री आनंद दुभाषी. यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या कार्यक्रमास सारस्वत बँकेचे संचालक श्री. सुनील सौदागर , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे श्रीयुत पुनाळेकर, श्रीयुत रघुवीर मंत्री श्रीयुत बाबा शेटये आदी मान्यवर उपस्थित होते