आंबव पोंक्षे आरवली रस्ता खचला

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे तीनतेरा

माखजन | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ ते माखजन सरंद-आंबव पोंक्षे मार्गे आरवली असा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ मधून हा रस्ता झाला आहे. यामधील आंबव पोंक्षे ते आरवली रस्त्यावर रस्ता खचला आहे.नुसता खचला नसून मैलाचा पुरलेला दगड देखील वाहून गेला आहे.

केंद्र शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या रस्त्याचे पहिल्याच पावसात तीनतेरा वाजले आहेत.या रस्त्याचे केंद्र शासनाच्या पथकाकडून तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या रस्त्याला खरोखर ज्या ठिकाणी संरक्षण भिंत हवी होती,त्या ठिकाणी बांधलीच गेली नाही.परंतु अनावश्यक ठिकाणी,कुणाची मर्जी सांभाळण्याच्या भावात,खाजगी ठिकाणी,संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत.शासनाचा अमूल्य निधी ठेकेदाराकडून खाजगी कामे करण्यासाठी वापरला गेल्याचे चित्र सध्या या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या निर्मितीत पाहायला मिळत आहे.ज्या ठिकाणी हा रस्ता खचला आहे त्या ठिकाणी संरक्षण भिंत होणे गरजेचे होते.

आंबव पोंक्षे चे सरपंच शेखर उकार्डे यांनी तशी सातत्याने मागणी देखील केली होती.परंतु संरक्षण भिंत घातली गेली नसल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी पत्रकारांना सांगितले. केंद्राची प्रधानमंत्री ग्रामसडक योजना म्हणजे परिपूर्ण रस्त्याचे काम म्हणून एक वेगळी प्रतिमा डोळ्यासमोर येते पण शिवाय हे काम करणाऱ्या ठेकेदाराला कामाच्या हमीचा कालावधी देखील ५ वर्षाचा असतो.परंतु आंबव पोंक्षे गावामध्ये रस्ता होऊन महिना होण्या आधीच पंतप्रधान ग्रामसडक योजचा बोजवारा उडाला आहे. सदर रस्त्याच्या कामी अनेक ठिकाणी भातशेतीमधून चुकीची गटारे मारण्यात आली आहेत.आवश्यक ठिकाणी गटारात पाईप हो टाकण्यात आलेले नाहीत.तर काही ठिकाणी जुने पाईप टाकून शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली आहे. ९ मीटर इतकी रुंदी असलेल्या कामात अनेक ठिकाणी एकाच बाजूच्या मालकाची जबरदस्ती जागा घेण्याचे प्रकार घडले आहेत.

या साऱ्याच गोष्टींची केंद्रशासनाच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता मजूर होण्यापूर्वी रस्त्यालगत असलेल्या जागा मालकांची कोणतीही नाहरकत घेण्यात आली नव्हती.रस्ता मंजूर झाल्यावर शेतकऱ्यांना आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीने मध्यस्थी करून रस्ता रुंदीकरणास अनुकूल करण्यात आले. ग्रामपंचायतीने मध्यस्ती करून जागा मालकांना अनुकूल केले व रस्ता झाला.पण शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराने घेतली होती.रस्ता व शेत यामध्ये मोठे गटार असेल तर पाईप टाकून देऊन आदी विविध कामांची हमी देण्यात आली होती.पण सध्या अनेक कामे तशीच राहिल्याने या गोष्टीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे व आंबव पोंक्षे ग्रामपंचतीने देखील हात वर केल्याचे चित्र आहे. सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून झालेल्या या रस्त्याची तातडीने उच्चस्तरीय पाहणी ,चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.