मडूरा पंचक्रोशीत पाचव्या दिवशीही ‘बत्ती गुल’ 

महावितरणचे अधिकारी कार्यालय बंद करून नॉट रिचेबल

बांदा l प्रतिनिधी :मडूरा दशक्रोशीतील गावे तब्बल पाच दिवसांपासून अंधारात आहेत. महावितरणच्या बांदा कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांना कार्यालय बंद असल्याने माघारी फिरावे लागले. महावितरणच्या बांदा २ कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू असून ग्राहकांना कोणी वाली नसल्याचा प्रकार सुरू आहे. शाखा अभियंता व वायरमन यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करावे, अशी संतप्त मागणी ग्राहकांमधून होत आहे.

 

महावितरणच्या बांदा २ विभागाचा भोंगळ व गलथान कारभाराचा फटका पहिल्याच पावसात बसला आहे. तब्बल ५ दिवस बत्ती गुल झाल्याने विशेषतः महिला वर्गाचे हाल होत आहेत. विजेअभावी दुकानदारांची आईस्क्रीम व कोल्ड्रिंक्स वाया गेली आहेत. मान्सूनपूर्व कामांचा फज्जा उडाला असून वायरमनसह कनिष्ठ अभियंता नॉट रिचेबल आहेत. बांदा कार्यालयही बंद आहे. शाखा अभियंता मोबाईल उचलत नसल्याने आता करावे तरी काय अशी ग्राहकांची अवस्था झाली आहे.

 

याबाबत जाब विचारण्यासाठी संतप्त ग्राहक शनिवारी सकाळी बांदा येथील कार्यालयात गेले होते. मात्र, कार्यालय बंद असल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. लाईट अभावी नळपाणीपुरवठा ठप्प झाला असून भर पावसात महिलांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.

 

मान्सूनपूर्व पहिल्याच अवकाळी पावसाने महावितरणच्या बोगस कामांची पोलखोल केली आहे. जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या, दुरुस्ती कामात ठेकेदारांकडून वापरण्यात येणारे दुय्यम व दर्जाहीन साहित्य यामुळे वारंवार विजेच्या समस्या उद्भवत असतात. मार्च महिन्याच्या अखेरपासूनच महावितरणचे वायरमन व कनिष्ठ अभियंता यांना वीज वाहिन्या वरील झुडपांची सफाई करण्यासाठी वारंवार कळविण्यात आले होते. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांवर पाच दिवस काळोखात राहण्याची परिस्थिती आली आहे.

 

याबाबत विचारणा करण्यासाठी कनिष्ठ अभियंता ठाकूर यांना कॉल केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन संबंधितांना निलंबित करावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.