राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजन

सावंतवाडी: आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग (HPC) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)’ या विषयावरील एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यशाळा यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (YBIT) येथे उत्साहात संपन्न झाली. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा, भोसले अभियांत्रिकी महाविद्यालय, सावंतवाडी आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.

 

एकूण सहा दिवसांची ही कार्यशाळा, पहिले तीन दिवस ऑनलाइन स्वरूपात तर उर्वरित तीन दिवस प्रत्यक्ष उपस्थितीत संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सी-डॅकचे संगणक शास्त्रज्ञ डॉ. आशिष कुवेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. उमेश चव्हाण यांनी ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि एआय’ या विषयाची सद्यस्थिती आणि भविष्यातील आवश्यकता यावर सखोल प्रकाश टाकला. त्यांनी यामागील राष्ट्रीय धोरण, शैक्षणिक क्षेत्रातील संभाव्य योगदान आणि औद्योगिक क्षेत्रातील गरजांबाबतही विस्तृत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान, उद्योगातील आधुनिक तंत्रप्रणालींचा परिचय, शैक्षणिक संशोधनाची दिशा आणि इंडस्ट्री ४.० मधील संधी याविषयी सहभागी प्राध्यापक आणि संशोधकांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेसाठी विविध नामांकित संस्थांमधील तज्ज्ञ वक्ते उपस्थित होते. यामध्ये आयआयटी मुंबईचे डॉ. ऋषिकेश जोशी, आयआयटी गोवाचे डॉ. शरद सिन्हा, डॉ. शीतला प्रसाद, सीओईपी, पुणेचे डॉ. अमित जोशी, सी-डॅकचे डॉ. कार्तिक नारायण, डॉ. जयश्री पवार, डॉ. हिमांशू शर्मा आणि एसपीआयटी, मुंबईचे डॉ. सुधीर ढगे यांचा समावेश होता. या कार्यशाळेत राज्यभरातील कॉम्प्युटर, कॉम्प्युटर सायन्स, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्राध्यापक व संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारत सरकार पुरस्कृत असलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सहभागी उमेदवारांना अनेक सुविधा मिळाल्या. त्यांना एचपीसी क्लस्टरवर विनामूल्य प्रयोगांची संधी देण्यात आली. तसेच, प्रवास भत्ता आणि निवास व भोजन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, वालचंदचे संचालक प्रा. डॉ. यु. ए. दबडे, नोडल सेंटर प्रमुख प्रा. डॉ. डी. बी. कुलकर्णी, भोसले टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि वालचंदचे प्रा. डॉ. यु. बी. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना एनव्हिडीया उद्योगमान्य प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या कौशल्यांना अधिकृत मान्यता मिळाली. या कार्यशाळेमुळे ‘हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रातील संशोधनाला आणि विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.