पोलिसात तक्रार दाखल
राजापूर (वार्ताहर): राजापूर शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात व्यक्तीने सुमारे तीन लाख रुपये लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी राजापूर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकाला मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीकडून वाट्सअप च्या माध्यमातून एक फसवी लिंक पाठविण्यात आली. ती लिंक त्यांनी ओपन केली आणि काही मिनिटात त्यांच्या खात्यातील तब्बल तीन लाख रुपये गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या प्रतिष्ठित नागरिकाने तात्काळ राजापूर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. दरम्यान ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असून त्याबाबत जनतेने सावधानता बाळगावी असे आवाहन राजापूर पोलिसांनी केले आहे.












