मारुती मंदिरनजिकच्या अपार्टमेंटच्या वॉचमनच्या खोलीत सापडले संशयास्पद मांस
सकल हिंदू समाज आक्रमक
शहर पोलिसांनी वॉचमन, त्याची पत्नी आणि काहींना घेतले ताब्यात
रत्नागिरी । प्रतिनिधी : रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर नजीक असलेल्या एकता मार्गावरील एका अपार्टमेंटच्या पार्किगमधील नेपाळी वॉचमनच्या खोलीत गोमांस सदृश्य मांस सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. हि घटना उघड होताच हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून मंगळवारी रात्री सकल हिंदू समाजाचे नागरिक पोलीस स्थानकात एकत्र आले होते. रात्री उशिरा शहर पोलिसांनी नेपाळी पती-पत्नीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार मारुती मंदिर नजीक संसारे उद्यानाजवळ मंगळवारी संध्याकाळी एका प्राण्याचा पाय सापडला होता. यानंतर रत्नागिरीतील हिंदू बांधव त्या ठिकणी एकत्र आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर एका दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकजण हातात पिशवी घेऊन तिथे उतरून निघून जातो हे दिसले, त्याचा तपास केला असता तो जवळच्या एका अपार्टमेंटचा वॉचमन असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर हे अन्य पोलिसांसह तिथे पोहोचले, तेव्हा वॉचमनच्या खोलीत एका टब मधे मोठ्या प्रमाणावर एका प्राण्याचे कापलेले पाय आणि मांस आढळून आले. त्यावेळी त्या वॉचमनची पत्नी तिथे उपस्थित होती.
हा सर्व प्रकार पाहून हिंदू बांधव संतप्त झाले, त्यांनी सखोल तपासाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ ते सीसीटीव्हीमधील दुचाकीस्वर आणि वॉचमनला शोधण्यासाठी पथक पाठवले तर पत्नीला ताब्यात घेण्यात आले. तर काही वेळात नेपाळी वॉचमन व अन्य काही जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. तोपर्यंत पोलीस स्थानकांवर हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा झाली होती. सापडलेले मांस नेमके कुणाचे आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला असतानाच आता काही जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. शहर पोलीस स्थानकाच्यावतीने सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरु असतांच हि घटना उघड झाली.









