खेडमध्ये टंचाई काळात एका टँकरने भागवली १,३९९ ग्रामस्थांची तहान

५१ दिवस टँकरने पाणीपुरवठा; ८३ फेऱ्यांचा समावेश, ३ गावातील ८ वाड्याही टँकरमुक्त
खेड(प्रतिनिधी)
जिल्हयाच्या पाणीटंचाई आराखड्यात दरवर्षी नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या तालुक्यात यंदा मात्र अवघ्या १६ गावे अन् १९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली. या गाव-वाड्यांतील १३९९ ग्रामस्थांना ५१ दिवस टैंकरने पाणीपुरवठा करून तहान भागवण्यात आली. यासाठी दिवसाआड टँकरच्या ८३ फेऱ्या धावल्या. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ तळे-पालांडेवाडीतील २५० ग्रामस्थांना बसली.
यंदा टंचाई आराखड्यांत २३ गावातील ६४ वाड्यांचा समावेश करण्यात आला असला तरी बहुतांशी वाड्यांना पाणी पुरवठ्याची गरजच भासली नाही. जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या नव्या नळपाणी योजनांसह विहिरींच्या खोदाईमुळे यंदा पाणीटंचाई लांबणीवर पडली. शिवाय ३ गावातील ८ वाड्याही टँकरमुक्त झाल्या.
३ एप्रिल रोजी घेरारसाळगड-बुथराईवाडी येथे पाण्याचा पहिला टैंकर घावला सुसेरी-देवसडेत खोदलेल्या नव्या विहिरीमुळे कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी या वाड्या पाणीदार झाल्याने ग्रामस्थांच्या भटकंतीला ब्रेक लागला. यापाठोपाठ पोसरे-सडेवाडीसह मूळगाव-देऊळवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या नव्या नळपाणी योजनेमुळे दोन्ही वाड्या टँकरमुक्त झाल्या. तालुक्यात १६ गावातील १९ वाड्यांची भिस्त एका टँकरवरच अवलंबून होती. मात्र सलग आठवडाभर मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घालत पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आणल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला. २३ में पासून टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये धावणाऱ्या टैंकरला लागलेला ‘ब्रेक’ अजूनही कायम आहे.
दरवर्षी, पाणीटंचाई आराखड्यात तालुक्याचे नवनवे विक्रम प्रस्थापित होतात. गतवर्षी ४४ वाड्यांतील ४.६६२ ग्रामस्थांची टँकरद्वारे तहान भागवण्यात आली होती. यंदा ही संख्या अवधी १३९९वर येवून थांबली. यामुळे ३,२६३ ग्रामस्थांची झालेली घट प्रशासनाला दिलासा देणारी ठरली. याशिवाय फेऱ्यांच्या संख्येतही घट झाली असून ५१ दिवस अवघ्या ८३ फेन्या धावल्या. यामुळे खर्चाची तितकीच बचत झाली.