मांगेलीतील घटना दुर्दैवी : भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणला देणार सूचना : आ. केसरकर

नगरपरिषदेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार 

सावंतवाडी । प्रतिनिधी : दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे विजेच्या धक्क्याने एका युवकाचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी दिली. भविष्यात अशा जीवघेण्या घटना टाळण्यासाठी महावितरणने योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदी उपस्थित होते.

आमदार केसरकर म्हणाले की, मांगेली कुसगेवाडी येथे विजेच्या जोरदार धक्क्याने घडलेला प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे. आपण लवकरच गवस कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहोत. महावितरणने या अपघाताची सखोल चौकशी करावी आणि भविष्यात कोणाचाही हकनाक जीव जाऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात येतील. तसेच, इतरही विजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*सावंतवाडी बसस्थानकाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास*

यावेळी बोलताना आमदार केसरकर यांनी सावंतवाडी बसस्थानकाच्या विकासासंदर्भातही माहिती दिली. सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार असून, हे बसस्थानक हायवे लगत असल्याने पूर्णपणे अत्याधुनिक होईल. सध्या बसस्थानकात पडलेले खड्डे आणि इतर डागडुजीची कामे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे बसस्थानक सावंतवाडीत उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

*नगरपालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार*

जिल्ह्यातील तिन्ही नगरपरिषदांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढल्या जातील आणि तिन्ही ठिकाणी महायुतीचेच नगराध्यक्ष विराजमान होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने स्थानिक पातळीवरही महायुती भक्कम असून, आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले.

 

*आंबोलीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणार*

पर्यटकांच्या सोयीसाठी आंबोली येथे वन विभागाकडून धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पर्यटकांनी या वाहनांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे पोलीस आणि वन विभागाशी चर्चा करून आंबोलीतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जाईल, अशी माहितीही श्री. केसरकर यांनी दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.