खेड(प्रतिनिधी)
प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-पनवेल एक्सप्रेस सेवा सावंतवाडी टर्मिनसपर्यंत वाढवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या परभणी, मराठवाडा, पुणे, मुंबई महानगर प्रदेश (MMR) आणि कोकणातून येणाऱ्या गाड्यांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे नांदेड-पनवेल एक्सप्रेस सेवा सावंतवाडी टर्मिनसपर्यंत वाढवावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
सध्या ही ट्रेन नांदेड आणि पनवेल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामार्गे धावते. पुणे, चिंचवड, तळेगाव आणि लोणावळा येथे थांबून प्रवाशांना सोयीस्कर पडते. परंतु, विस्तृत विभागांना सेवा देण्याची तिची क्षमता अद्याप वाढलेली नाही. यामुळे या ट्रेनचा विस्तार सावंतवाडी रोडपर्यंत करावा, ज्यामुळे मराठवाडा-पुणे-कोकण दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी शक्य होईल
या गाडीला कल्याण, जंक्शनमार्ग वळवळल्यास कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा आणि जवळच्या शहरांमधील हजारो प्रवाशांना सेवा मिळेल. कोकणात जाताना आम्हाला येणाऱ्या अडचणीचा रेल्वे प्रशासनाने विचार करीत सेवा सुलभ करावी.
– जयेश नारळीकर, रेल्वे प्रवासी
हा प्रस्ताव मराठवाडा, पुणे आणि कोकण प्रदेशातील थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीमधील दीर्घकालीन अंतर भरून काढेल. सध्या, तिन्ही प्रदेशांना थेट जोडणारी एकही ट्रेन नाही. प्रस्तावित मार्ग बदल केल्यास प्रवाशांना, पर्यटकांना मोठा फायदा होईल. रेल्वे बोडनि याचा विचार करत प्रलंबित मागणी पूर्ण करावी.
– अक्षय महापदी,
सचिव- अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती












