सदानंद कदम यांची सीआरए तंत्रज्ञान आधारित यशस्वी लागवड
खेड (प्रतिनिध
खेड तालुक्यात हवामानातील बदलांचा परिणाम कमी करत शाश्वत आणि उत्पादनक्षम शेती कशी करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण वेरळ गावातील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सादर केले आहे. त्यांनी आपल्या शेतात तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सीआरए (Climate Resilient Agriculture) टेक्नॉलॉजीनुसार विविध झाडांची यशस्वी लागवड केली आहे.
ही लागवड शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आली असून ती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे हवामान बदलांचा फटका कमी होतो आणि शेतीत सातत्याने उत्पादन घेता येते. शेती हे एक शास्त्र आहे आणि त्यानुसार काम केल्यास निश्चित यश मिळते, असा विश्वास आप्पा कदम यांनी या प्रयोगातून सिद्ध केला आहे. तालुका कृषी अधिकारी रविंद्र माळी यांनी देखील आप्पा कदम यांच्या शेताला भेट दिली असून, ही शेती हवामान अनुकूल शेतीचा आदर्श नमुना असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड करण्यापूर्वी वेरळ येथे सदानंद कदम यांच्या शेतालाभेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
तालुका कृषी विभागाचं उद्दिष्ट प्रत्येक गावात चार ते पाच हेक्टर आणि संपूर्ण तालुक्यात ४०० हेक्टर क्षेत्रावर अशी शाश्वत लागवड करण्याचे आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक सल्ला दिला जात आहे. आप्पा कदम यांच्या यशामुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, हवामान बदलाश जुळवून घेणारी शेती ही काळाची गरज असल्याच जाणीव शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.











