रत्नागिरी :
२५ जून २०२५ – देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळ्या दिवसाला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिलेल्या वीरांचा आज रत्नागिरी येथे भारतीय जनता पक्ष शहर मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
भाजप रत्नागिरी शहर मंडळाचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आणीबाणीच्या लढ्यात सहभागी झालेले श्री प्रदीप चंद्रकांत परुळेकर, श्री श्रीधर सुभाष राणे, श्री शिवराम बाळकृष्ण ठीक, श्री महेंद्र रामचंद्र सुर्वे, श्री श्रीकांत अनंत मुकादम, श्री बळवंत मधुसूदन वेलणकर, श्री संजय शांताराम केतकर आणि श्री विवेक जगन्नाथ भावे या सत्कारमूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर यांनी त्या काळातील आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष (महिला) वर्षा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत डिंगणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश केळकर, महिला शहराध्यक्षा पल्लवी पाटील, ज्येष्ठ पदाधिकारी बाबासाहेब परुळेकर यांची उपस्थिती होती.
भारतातील लोकशाही इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून ओळखली जाणारी आणीबाणी २५ जून १९७५ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली लागू करण्यात आली. संविधानाच्या कलम ३५२(१) अंतर्गत राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने ही आणीबाणी जाहीर झाली. मात्र, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेचा बनाव करून ही आणीबाणी लादली गेली आणि त्यामार्फत संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले.
या काळात इंदिरा गांधींनी लोकशाही मूल्यांची पायमल्ली करत सर्व अधिकार स्वतःच्या हातात घेतले. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या अनेक राजकीय विरोधकांना अटक करण्यात आली. नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित करण्यात आले, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले
या सर्व अत्याचारांना विरोध करण्यासाठी देशभरातील कार्यकर्ते भूमिगत झाले आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष सुरू केला. समाजवादी विचारांचे अनेक कार्यकर्ते, आरएसएसचे स्वयंसेवक आणि इतर लोकशाहीप्रिय नागरिकांनी या जुलमी सत्तेच्या विरोधात कठोर लढा दिला.
या लढ्याचा परिपाक म्हणजे मार्च १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव आणि जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली मोरारजी देसाई यांचे भारताचे पहिले काँग्रेसविरोधी पंतप्रधान म्हणून सत्तेवर आगमन. रायबरेली मतदारसंघात इंदिरा गांधी यांचा पराभव हा लोकशाहीचा विजय ठरला.
आज, या ऐतिहासिक सत्याचा स्मरण करताना भारतीय जनता पक्षाने त्या काळात लढा दिलेल्या योद्ध्यांचा गौरव करत लोकशाहीच्या मूल्यांसाठी निष्ठा दाखवली. काँग्रेसने केवळ सत्तेसाठी केलेल्या या घटनाबाह्य, असंविधानिक कृत्याचा ठाम निषेध करण्यात आला.











